ठाणे- शहरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या तासाभरात 34 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर आज सकाळपासून 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस ठाणे शहरात पडला असून आता पर्यंत ठाण्यात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 244.03 मिलिमीटर पाऊस पडला होता.
आज सकाळ पासूनच ठाण्यात ढग दाटून आले होते. काही ठिकाणी रात्रीपासूनच तुरळक पाऊस पडत होता आणि विश्रांती घेत होता. मात्र आज 12.30 वाजल्यापासून ठाण्यात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून एक प्रकारे ठाणे शहर पावसात न्हाऊन निघाले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात तुरळक प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील तलावपाळी, वंदना सिनेमा, घोडबंदर रोड हिरानंदानी मेडोज, वाघबिळ, घोडबंदर, वागळे स्टेट, तीन हात नाका, खोपट या सारख्या परिसरात पावसाचा जोर अजूनही कायम आहे.