ठाणे - ठाण्यात मंगळवारी (8 जून) मध्यरात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. पालिकेने केलेले सर्व दावे पाण्यात वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वृंदावन सोसायटी येथे रस्त्यांची उंची वाढवल्याने या परिसरात पाणी शिरले. गुडघाभर पाणी साचल्याने नागरिक पाण्यातून वाट काढत चालताना दिसले. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ठाणे शहरातील 47 ठिकाणी पाणी तुंबले. तर मुंब्र्यात दोन ठिकाणी भूस्खलन झाले. भिंत-झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. मुंबईकडे जाणारी व मुंबईहून येणारी सेवा बंद झाली. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूप हाल झाले.
रेल्वे सेवा ठप्प
मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिली. पहाटेपासून ठाणे-मुंबईसह उपनगरात आणि शेजारील पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. मात्र, मान्सूनच्या पहिल्याच पावसाने ठाणेकरांची दैना उडवली. तर, काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणेही अवघड झाले. पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली.
ठाणे शहराला झोडपले
केरळमधून पुढे सरकलेला मान्सून वायूवेगाने एक दिवस आधीच ठाणे-मुंबईत दाखल झाला. त्यातच बुधवारपासून पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसारस पावसानेही हजेरी लावली. ठाण्यासह मुंबई आणि उपनगरात सोमवारी (7 जून) रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. ठाणे शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. सलग पाऊस पडल्याने ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुडघ्यापर्यंत पाणी साचले. याच पाण्यातून वाट काढत रहिवाशांना आणि वाहनचालकांना जावे लागले.
हेही वाचा - रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन