ठाणे - मुसळधार पावसाने एकीकडे जिल्ह्यात हाह:कार उडाला असतानाच भिवंडी शहर व ग्रामीण भागातही पावसाने धुमाकूळ घातल्याने भिवंडी शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहे. तर बहुतांश सखल भागातील दुकांनासह रस्त्यांवर पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात रविवारी सकाळपासून हवामानात बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. त्यातच रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे भिवंडीत मुख्य रस्ता असलेल्या कल्याण नाका ते वांजरपट्टी नाका परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करीत वाहतूक कोंडी फोडताना पाहायला मिळाले. तसेच शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. पहिल्याच मुसळधार पावसाने नाले सफाईची पोलखोल केली आहे.
वाहतूक व्यवस्था कोलमडली
भिवंडी शहरातील निजामपुरा, कनेरी, कमला होटेल , नारपोली, पद्मा नगर, तीन बत्ती, शिवाजी नगर, भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागात शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे हाल झाले आहे. दरम्यान, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजूर फाटा, वंजारपट्टी नाका, नारपोली अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
हेही वाचा -Mumbai Rains : कांदिवलीतील महापालिकेच्या पे अँड पार्कमधील 400 वाहनांना जलसमाधी