नवी मुंबई - झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. झोपडपट्टीतील नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्यास पालिकेच्या रुग्णालयात लवकरात लवकर तपासणी करून उपचार घ्यावे, असे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
गुरुवारी शिवाजीनगर झोपडपट्टी येथील दोन कुटुंबातील 13 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज शिवाजीनगर झोपडपट्टी येथील नागरिकांसाठी ताप तपासणी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
पनवेल शहरात अनेक झोपडपट्ट्या आहेत. येथील नागरिकांचे स्वच्छतागृह सार्वजनिक असल्याने नागरिकांना इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत लवकर कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्यास किंवा कोणतीही लक्षणे आढळून आल्यास त्यांनी लगेच पालिकेच्या रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.