नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आफ्रिकेतील मलावी मँगो बाजारात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना ऐन नोव्हेंबर मध्ये हापूसची चव चाखायला मिळणार आहे. हा आंबा 15 डिसेंबरपर्यंत बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती व्यापारी वर्गातून देण्यात येत आहे.
हेही वाचा - आम्ही आघाडीसोबत जातोय, त्यासाठी भाजपनेच शुभेच्छा दिल्या - उद्धव ठाकरे
आफ्रिकेत मलावी नावाच्या देशातील नागरिकांनी 8 ते 10 वर्षांपूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग व दापोली परिसरातून आंब्यांच्या कांड्या मलावीत नेल्या होत्या. हा एक अभिनव प्रयोग होता. या कांड्याचे योग्य संवर्धन करून त्याचे रूपांतर कलमात केले गेले. सुमारे 600 हेक्टरवर कोकणातील हापूसच्या कलमांची लागवड केली गेली. मलावीमध्ये हापूस आंबा नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये परिपक्व होतो.
आफ्रिकेतील मलावी या देशात या आंब्याचे उत्पन्न घेतल्याने बाजारात हा आंबा 'मलावी मँगो' या नावाने नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षीही हा आंबा विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होता मात्र यावर्षीच्या तुलनेत प्रमाण कमी होत. मलावी मँगो दिसायला चवीला पूर्णतः कोकणातील हापूस आंब्या सारखा आहे.
आंब्याचा भाव -
आंब्याच्या एका पेटीची किंमत 1400 रुपयांपासून ते 2000 रुपये इतकी आहे. मोठा आंबा असेल तर एका पेटीत 9 आंबे असून आंब्यांचा आकार जसा कमी होतो तसे १२ ते १६ आंबेही एका पेटीत ठेवण्यात आले आहेत. मलावीमधून हा आंबा जहाजातून येत असून नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 600 पेट्या मलावी मँगो येत आहे. हा आंबा १५ डिसेंबरपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती फळ विक्रेते संजय पानसरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - आरटीआयच्या चौकटीत सरन्यायाधीशांचे कार्यालय येणार? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णय