ठाणे - जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शहापूर उपजिल्हा रुग्णालय तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असुविधांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे दिसून आले. तर, १ वर्षाच्या आर्यन पांडूरंग पारधी या बालकाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
शहापूर शहरात असलेले पूर्वीचे ग्रामीण रुग्णालय काही वर्षांपूर्वी उपजिल्हा रुग्णालय नावाने नव्याने सुरू करण्यात आले. १०० खाट असलेल्या या रुग्णालयात कायमस्वरुपी तज्ज्ञ डॉक्टरांचा वाणवा असतो. मात्र, आजमितीस फक्त ६ डॉक्टर या रुग्णालयाचा गाडा हाकत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात आजपर्यंत स्त्री रोग तज्ज्ञ नाहीत. यामुळे गर्भवती स्त्रियांच्या प्रसूतीच्या काळात काही गंभीर परिस्थिती उद्भवली तर रुग्णांना कल्याण-ठाणे येथे हलवावे लागते. तसेच बालरोग तज्ज्ञही नसल्याने रुग्णांची अवस्था बिकट होत आहे. हाड रोग तज्ज्ञ सहसा रजेवर असतात. त्यामुळे रुग्णाला खासगी ठिकाणी हलवावे लागते. तर, 108 रुग्णवाहिकांची सुविधा ढासळल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णवाहिका भाड्याने करून जावे लागते. अशा गंभीर समस्यांनी हे उपजिल्हा रुग्णालय ग्रासले आहे.
हेही वाचा - ठाणे: अंमलीपदार्थाची तस्करी करणारी चौकडी पोलिसांच्या ताब्यात
शहापूर तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथे कुपोषणाचे प्रमाण नेहमीच वाढते आहे. त्यात रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नसल्याने गोर गरीब बालकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. सोनोग्राफीसारखी आद्यावत मशीन आणलेली असून तिला चालवण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने ते देखील बंद आहे. हीच परिस्थिती सिटीस्कॅन मशीनची असून तंत्रज्ञ नसल्याने ती देखील बंद आहे. तसेच वेळीच 108 रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याची ओरडही रुग्णांकडून केली जात आहे. एकंदरीत शहापूर उपजिल्हा रुग्णालय हे सर्व सोई सुविधायुक्त असले तरी डॉक्टरांच्या आभावामुळे हे रुग्णालय शोभेची वास्तू बनले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी, अनेक महिला प्रसूतीसाठीही येत असतात. मात्र, या ठिकाणी रात्री तसेच दिवसा विजेचा भरवसा नसल्याने अनेक रुग्णांना तसेच प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्रात सौर उर्जावर चालणारे दिवे-पंखे बंद पडलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस आरोग्य केंद्रातील रुग्णांसह, कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाच आजारी असल्याने त्यांच्याकडे असलेल्या रुग्णांची काय आणि कोण सोय करणार? असा प्रश्न तेथील डॉक्टरांना पडला आहे.
108 रुग्णवाहिकेचा प्रश्न ऐरणीवर
शहापूर तालुक्यातील कृष्णाची वाडी येथील आर्यन पांडूरंग पारधी या 1 वर्षाच्या मुलावर बाळरोग तज्ज्ञ नसल्याने योग्य उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे त्याला ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. रुग्णाच्या वडिलांनी 108 ची रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, सध्या रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे कारण देत येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेमधून जाण्यास सांगितले. जवळ पैसे नसतानाही आर्यनच्या पालकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी या रुग्णवाहिकेचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित झाला. तर, खासगी रुग्णवाहिका आणि 108 चे काहीतरी साटेलोटे आहेत का? असा प्रश्नही येथील काही नागरिकांना पडला आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे - एकनाथ शिंदे
आर्यनला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नव्हती, ही घटना एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली. उपजिल्हा रुग्णालयाची सुधारणा करणे काळाची गरज असून आमदार दौलत दरोडा यांना रुग्णकल्याण समितीवर प्रतिनिधी नेमून लक्ष देणे गरजेचे आहे. तर, शहापुरात कोणतेही वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार नाहीत. इतर सर्व पदे आम्ही भरली आहेत. मात्र, कायम डॉक्टर मिळत नसल्याने इमर्जन्सीसाठी आपण रुग्णांना ठाण्यावरून मदत देत असतो. लहान मुलांची शस्त्रक्रिया, उपचार हे सर्व शक्य आहे ते आम्ही करतो, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
दरम्यान, कसारापासून पडघ्यापर्यंत महामार्गावर आणि रेल्वेचे जे अपघात होतात, त्या सर्व रुग्णांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे येथेच सर्व सुविधा असणे गरजेचे आहे. 108 सेवा ही मागील सरकारच्या काळात निर्माण झाली. मात्र, या रुग्णवाहिकांची दुरुस्ती करण्यासाठी शासन निधीची तरतूद करत नाही. त्यामुळे येथे या रुग्णवाहिका पडून धूळ खात आहेत. डॉक्टरांची कमतरता हा विषय नेहमीचाच असल्याने या गंभीर बाबीकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी या निमित्ताने समोर आली आहे.
हेही वाचा - शिवसेना आमदारांचा हॉटेल लेमन ट्रीमध्ये जल्लोष