ठाणे - मुस्मीम समाजाच्या बकरी ईद सणा निमित्ताने मुंब्रा शहरात बकरा बाजारचे आयोजन करण्यात आले आहे. या बाजारात देशभरातील विविध भागातून बकरे विक्रीसाठी आणले जात आहेत. याच बाजारात एका बकऱ्याला दीड लाख रुपयांची किंमत मिळाली आहे. यामुळे या बकऱ्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
सोमवारी बकरी ईद हा सण येतो आहे. यासाठी मुंब्रा शहरात बकरा बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. या बाजारात राज्यातील मालेगाव, धुळे, येवला, सातारा आणि जुन्नर या भागातून बकरे विक्रीसाठी आणले जात आहेत. सोबतच मध्य प्रदेश, गुजरात, राज्यस्थान आदी राज्यातून देखील या बाजारात बकरे विक्रीसाठी आणले जात आहेत.
या बाजारात विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या बकऱ्यांची किंमत हजारोंच्या घरात आहे. यात सर्वात आकर्षित ठरला दीड लाख रुपयांचा पांढरा-शुभ्र रंगाचा, पतिरा, हैदराबादी आणि सुजात या तीन जातीचा एक बकरा. हा बकरा १८ महिन्यांचा असून त्याचे वजन १०५ किलो आहे. त्यामुळे या बकऱ्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
या बाजारात बकऱ्यांची खरेदी दात बघून करण्यात येते. यामध्ये दोन दातांचा, चार दातांचा, सहा दातांचा बकरा असे प्रकार पडतात. दरम्यान, बाजारात हजारो बकऱ्यांची विक्री होत असून त्यांची किंमत 5 हजार ते 5 लाखांपर्यंत आहे. तर हवा असलेल्या बकरा खरेदी करण्यासाठी काही ग्राहक बोली लावून बकरे विकत घेताना दिसतात.