ठाणे: जिग्नेश मोरेश्वर जाधव असे फरार झालेल्या आरोपी मित्राचे नाव आहे. तर काजल इस्माईल शेख असे गंभीर जखमी झालेल्या मैत्रिणीचे नाव असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी काजल ही डोंबिवली पूर्व भागात राहते. तर आरोपी मित्र जिग्नेश हा डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा भागात राहतो. दोघांमध्ये मैत्री होती; मात्र मैत्रीच्या आडून आरोपी जिग्नेश हा काजलवर एकतर्फी प्रेम करीत होता. त्यातच १४ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काजल ही एकटीच घरी पायी जात होती. यावेळी जिग्नेशने तिला रस्त्यात थांबवून 'तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्या बरोबर ये,' असे बोलले; परंतु, काजलने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जिग्नेशने तिच्यावर हल्ला चढवत गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
काजलला रुग्णालयात केले दाखल: घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत गंभीर जखमी अवस्थेत काजलला डोंबिवलीतील रुग्णालयात दाखल केले; मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा तेथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांकडून तपास सुरू: सध्या जखमी काजलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घटना १४ एप्रिल रोजी घडली असून आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे अधिक माहिती देण्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बाकले करीत आहेत.
वादातून मुलीवर जीवघेणा हल्ला: ठाण्यात यापूर्वीही एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घटली होती. मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून फोटोग्राफर असलेल्या २५ वर्षीय प्रियकराने २४ वर्षीय प्रेयसीवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना ठाण्यात 21 ऑगस्ट, 2022 रोजी घडली होती. ही घटना बदलापूर पश्चिम भागातील बेलवली येथील एका इमारतीच्या टेरिसवर घडली होती. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात हल्लेखोर प्रियकरावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चार वर्षांपासून होते प्रेमसंबंध: पीडित २४ वर्षीय तरुणी बदलापूर पश्चिम भागातील बेलवली परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहते. तर आरोपी प्रियकर विशाल हा बदलापूर पश्चिम भागातील मांजर्ली भागात राहून फोटोग्राफरचा व्यवसाय करतो. या दोघांमध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यातच १९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास प्रेयसीच्या मोबाईलवर कॉल करून तिला बदलापूर पश्चिम भागातील एका ठिकाणी आरोपी प्रियकराने भेटायला बोलावले होते. मात्र तिने येण्यास नकार देऊन प्रियकराचा मोबाईल नंबर ब्लॉक करून ठेवला.
हेही वाचा: Prakash Ambedkar : पंधरा दिवसात राज्यात मोठा राजकीय बॉम्बस्फोट, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ