ठाणे- अत्याचार करण्याच्या उद्देशाने ९ वर्षीय चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकील अहमद मोहम्मद मुस्तकीन(वय 30) रा. कापतलाव, भिवंडी असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
इमारतीमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाच्या सतर्कतेमुळे हा नराधम पीडितेला तेथेच टाकून पळून गेला. ही धक्कादायक घटना भिवंडी शहरातील जैतुनपुरा परिसरातील एका इमारतीच्या जिन्यात घडली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या वडिलांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अपहरण आणि विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित चिमुरडी शनिवारी दुपारच्या सुमारास इमारतीखाली असलेल्या दुकानात पाव घेण्यासाठी गेली होती. ती घरी परतत असताना आरोपी अकील याने तिला पाठीमागून येऊन तिचे तोंड दाबले. त्यानंतर आरोपी तिचे अपहरण करीत इमारतीवर घेऊन जात होता. यावेळी इमारतीमध्ये राहणार्या एका रहिवाशाने त्याला हटकले असता, त्याने पीडित मुलीला टाकून घटनास्थळावरून पळ काढला.
पीडित चिमुरडी घरी रडत आल्याने घरच्यांनी तिची चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून चिमुरडीवर गुदरलेल्या प्रसंगाचे कथन केले. यावर पोलिसांनी नराधमावर भदवी ३६३, ३६६ (ए), ५०६, ५११, आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक योगेश दाभाडे यांनी दिली.