ठाणे - येथील कोपर-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान आज सकाळी लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविता नाईक असे मृत तरुणीचे नाव आहे. लोकलमधील वाढत्या गर्दीचा हा डोंबिवलीतील आणखी एक बळी ठरला आहे. गेल्या दोन आठवड्यापूर्वी देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती.
आज सकाळी मृत सविता हीने कामावर जाण्यासाठी डोंबिवलीहून सीएसटीकडे जाणारी जलद लोकल पकडली होती. मात्र, या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने गर्दीचा रेटा कोपर-दिवा स्थानकादरम्यान आणखीन वाढल्याने तिचा तोल जाऊन ती लोकलमधून खाली पडली. आणि तिचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचा शास्त्रीनगर रुग्णालयात रवाना केला आहे.
दरम्यान , कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल गाड्यांमध्ये नेहमीच प्रचंड गर्दी असते. सकाळच्या सुमारास तर डोंबिवली रेल्वे स्थानकातून लोकल पकडणेही प्रवाशांना जिकिरीचे असते. त्यातच वाढत्या गर्दीमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन या गंभीर बाबींकडे लक्ष देईल का ? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.