ठाणे - भिवंडीतील त्या 21 वर्षात तरुणांच्या हत्येचा उलगडा करण्यात ठाणे ग्रामीण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या गळ्यातील सोनसाखळीसाठी मित्रानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आकाश नारायण शेलार वय (21) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मयुर मोतीराम जाधव (वय 20) असे हत्याप्रकरणी अटक केलेला मित्राचे नाव आहे.
भिवंडी तालुक्यातील करंजजोटी गावातील मृत आकाशला मारेकर्यांनी मोबाईलवरून संपर्क करून गावालगतच्या माळरानावर बोलवून त्याची शुक्रवारी सायंकाळी हत्या केली होती. हत्या करून त्याचा मृतदेह लगतच्या झाडाझुडपात फेकून देऊन मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक पडघा पोलीस व ठाणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण पथकांमार्फत सुरू होता.
हत्या झालेल्या आकाशाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी व मोबाईल गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ही हत्या सोनसाखळी चोरण्यासाठी केली असावी असा अंदाज बांधून पोलिसांनी तपास सुरू केला होता. यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मृत आकाश याचा मोबाईल सीडीआर तपासणीसाठी टाकला असता मोबाईल लोकेशन करंजजोटी गावातच दाखवत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी कसून शोध घेतला असता गावातील आरोपी मयूर जाधव यांच्या घरात मोबाईल लोकेशन आढळून आले. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय परशुराम लोंढे, पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे ,पोलीस हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, प्रवीण हळबे, पोलीस नाईक अमोल कदम हनुमंत गायकर, सुहास सोनवणे आदींच्या पोलीस पथकाने आरोपी मयूर यास शनिवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. यावेली त्याने मित्र आकाश शेलार यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यासाठी त्याला माळरानावर बोलवून बॅटच्या साह्याने डोक्यावर, हातावर, मान्यवर जोरदार प्रहार करून त्याला ठार मारले. त्यानंतर गळ्यातील सोनसाखळी काढून घरात आणून ठेवली, अशी कबुली त्यांनी पोलिसांना देत ही सोनसाखळी विकून मोटारसायकल घेणार होता, अशीही कबुली पोलिसांना दिली आहे.
सोनसाखळी आरोपी मयूर याच्या घराच्या पोट माळ्यावर ठेवली होती, ती काढून त्याने पोलिसांच्या स्वाधीन केली. मयूर याने मित्राची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन जप्त केलेली सोनसाखळी व मोबाईल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पडघा पोलिसांच्या ताब्यात दिले. पडघा पोलीस ठाण्याचे एपीआय पवन चौधरी यांनी खुनी मयूर जाधव यास अटक करून आज रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता पोलीस तपासात आरोपी मयूर सोबत त्याचा आणखी एक साथीदार हत्येप्रकरणी सामील असल्याचे समोर आल्याने पोलीस त्याचाही शोध घेत आहे.