ठाणे Free Medicine : सुमारे ५०० वर्षानंतर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातून तसेच परदेशातून रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये उपस्थित राहणार आहेत. (Generic Aadhaar) लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांना वैद्यकीय औषधांची गरज लागू शकते. भाविकांना योग्य वेळी औषधे मिळावीत, त्याची उणीव भासू नये यासाठी "श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट" तर्फे भारतातील सर्वांत वेगाने वाढणारी फार्मा कंपनी "जेनेरिक आधार" ला औषधे पुरवठा करण्यास निवेदन आले आहे. (Arjun Deshpande) याचा स्वीकार करीत २१ वर्षीय युवा उद्योजक, जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्यात बुधवार, ०३ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथे विनामूल्य औषधे रवाना करण्यात आली आहेत.
जवळपास 50 लाख भाविक येणार: १५ जानेवारी २०२४ म्हणजेच मकर संक्रांती पासून ते फेब्रुवारी महिनाअखेर पर्यंत पन्नास लाख श्रद्धाळू अयोध्या नगरीमध्ये येऊ शकतात. अयोध्या नगरी हे एक छोटेसे शहर असून या नगरीमध्ये तब्बल ३००० मंदिरे आहेत. प्रवासाचा थकवा, हवामानातील बदल, कडाक्याची थंडी आणि खाण्यापिण्यातील बदलामुळे भाविकांना आजारपण येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत औषधांची गरज भासू शकते. यासाठी "श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र" ट्रस्ट तर्फे आलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जेनेरिक आधारची औषधे अयोध्या नगरीकडे रवाना करीत आहोत, असे अर्जुन देशपांडे म्हणाले.
कोणकोणत्या औषध गोळ्यांचा समावेश: अयोध्येला पाठवण्यात येणाऱ्या या विनामूल्य औषधांमध्ये पॅरासिटामोल ६५० (तापासाठी), डायक्लोफेनॅक लिन्सीड ऑइल जेल (वेदनाशामक), लेवोसिटीरिझाईन (अँटी ऍलर्जी), अजिथ्रोमाइसिन (एंटीबायोटिक), मेटफॉर्मिन (अँटी डायबेटीक), टेलमिसर्टन (हृदय रोग), अमलोदीपिन (उच्च रक्तदाब), मल्टिव्हिटॅमिन कॅप्सूल्स तसेच पँटोप्राझोल डोंपेरीडॉन (ऍसिडिटी) सारख्या औषधांचा समावेश आहे.
राष्ट्रीय सुटी जाहीर करा: 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे भव्य राम मंदिर लोकार्पण सोहळा होत आहे. या सोहळ्याची सर्वांना अनुभूती घेता यावी यासाठी सरकारने राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महंत पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी केली आहे. राज्य आणि केंद्र सरकारला आमची विनंती आहे की, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माण आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त सरकारने राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी. जेणेकरून या दिवशी सर्वांना या आलौकिक घटनेची अनुभूती घेता येईल, असे ते म्हणाले.
130 देशांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित: अयोध्येत भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. या दिवशी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील होणार आहेत. (Ram Mandir Ayodhya) प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक आठवडा आधीपासूनच पूजा-अर्चा सुरू होणार आहे. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला 130 देशांचे प्रतिनिधी, साधू, महंत अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराचं 22 जानेवारीला सकाळी उद्घाटन होणार आहे. मंदिर लोकार्पणाचा जवळपास सात दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. हा सोहळा झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे.
हेही वाचा: