ठाणे - पंतप्रधान मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ( Dream Projects on PM Narendra Modi ) मुंबई – बडोदा महामार्गात ( Mumbai Baroda Highway ) भिवंडी तालुक्यातील नंदिठणे गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहे. त्यामुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबदला राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये अदा करण्यात आला आहे. यापैकीच आठ शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनीचे मुख्य सूत्रधारासह त्यांच्या टोळीतील आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार केली होती. खळबळजनक बाब म्हणजे मुख्य सूत्रधार नायब तहसीलदार असून त्याची एक मैत्रीणही या गुन्ह्यात सहभागी आहे. या सर्व आरोपींनी मिळून शासनाकडून मूळ शेतकऱ्यांना मिळालेली ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रूपयांची रक्कम परस्पर काढून घेऊन शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात ( Shanti Nagar Police Station ) दाखल करण्यात आला होता. महिनाभरापासून या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेला नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्यालाही गजाआड केल्याने आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
जमीन घोटाळ्याचा झाला पर्दाफाश - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील नंदिठणे गावातील मूूळ जमीन मालक नारायण रामजी भोईर यांची एकूण आठ सर्व्हे क्रमांकामध्ये एकूण १७ हजार ८२४ चौरस मीटर जमीन आहे. ही जमीन मुंबई बडोदा महामार्गासाठी लागणार असल्याने शासनाने अधिग्रहित केली. मात्र, नारायण भोईर यांचे निधन झाल्याने त्यांच्या नऊ वारसांच्या नावे अधिग्रहित जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळणार होता. दरम्यान, सर्व शासकीय नोंदणीची कागदपत्रे नरेंद्र नारायण भोईर यांनी आपल्या भावंडांच्या दस्तऐवजासह महसूल कायार्लयात जमा केली. त्या कागदपत्रांच्या आधारे उपविभागीय कार्यालयाने जमीन अधिग्रहणाची ११ कोटी ६६ लाखाची 64 हजारांची रक्कम मृत भोईर यांच्या बँक खात्यात गेल्या वर्षी जमा केली. मात्र, रक्कम संबिधत वारसांना मिळाली नसल्याने ठाणे पाचपाखाडी येथे राहणारे मृत शेतकऱ्याचे वारस विनीत भोईर, अमोल भोईर आणि हरेश भोईर हे वारस भिवंडी उपविभागीय कार्यालयात आले. त्यांनी नंदिठणे येथील नारायण भोईर यांचे वारस आपण आहोत. जमीन अधिग्रहणाचा मोबदला आम्हाला द्यावा म्हणून अर्ज दिला. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता मूळ मालक हे तीन भाऊ असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घोटाळा - भिवंडी तालुक्यातील नंदिठणे येथील आठ मूळ जमीन मालकांच्या नावाचे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून त्या आधारे भिवंडीतील दस्त नोंदणी कार्यालयात बनावट दस्त, खोट्या स्वाक्षऱ्या करुन नारायण भोईर यांच्या जमिनीचा मोबादला अज्ञात व्यक्तींनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी भिवंडी उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून संजय गाढवे यांच्या तक्रारीवरून २५ एप्रिलला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असता होता. त्यामध्ये नायब तहसीलदार गोसावी आणि त्याची मैत्रीण मनिषा पगारे (जाधव) या दोघांनी मिळून भाजपचे भिवंडी पंचायत समितीचे सदस्य व माजी सभापती असलेले गुरुनाथ जाधव तसेच वकिल प्रवीण चौधरी यांच्या संगनमत करून बनावट वारस शेतकरी बनवून संबंधित जमिनीचे कागदपत्र तयार करून ११ कोटींच्यावर राज्य सरकारला चुना लावल्याचे उघडकीस आले आहे.
शेतकऱ्यांच्या नावे बँकेत बोगस खाते - जमिनी घोटाळा भिवंडी तालुक्यात करून जमिनीचा मिळणाऱ्या मोबदल्यासाठी थेट मुरबाड तालुक्यातील आयसीआयसी बँकेच्या शाखेत मृत शेतकऱ्याचे नावे खाते उघडण्यात आले. विशेष म्हणजे मृताच्या ठिकाणी आरोपी कृष्णमिलन शुक्ला याचा फोटो लावून खाते उघडले होते. याच खात्यात ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रूपयांची रक्कम जमा झाली होती. तर भाजपचे भिवंडी पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ जाधव यांनी बोगस शेतकरी उभे केले. बाकीच्या आरोपींनी दस्त नोंदणी कार्यालयात बनावट दस्त, खोट्या स्वाक्षऱ्या करून शेतकऱ्यांसह सरकारची फसवणूक केली आहे.
आणखीही जमीन घोटाळे समोर येणार .. - ठाणे जिल्ह्यात समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन मार्ग, मुंबई–बडोदा महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पाचे कामे सुरू आहेत. तीन महिन्यांपूर्वीच २४ फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात मुख्य आरोपी नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी हा अडकला होता. तर तत्कालीन उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांचीही कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या काळात समुद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या. त्यामध्येही मोठा घोटाळा झाल्याच्या अनेक तक्रारी पीडित शेतकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र, त्या तक्रारीचे पुढे काय झाले हेही गुलदस्ताच असल्याने भिवंडी उपविभागीय कार्यलय कायमच चर्चेत राहिले आहे.
२३ मे पर्यंत पोलीस कोठडी - २५ एप्रिलला उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून संजय गाढवे यांनी या फसवणूक प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी हे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. पण, हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या गोसावींचा शोध शांतीनगर पोलिसांनी ठिकठिकाणी घेत असताना रविवारी उशिरा त्यांना मुंबई गोराई येथून ताब्यात घेऊन सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली आहे.