ठाणे - तलावातील मासे चोरल्याचा खोटा आरोप करुन दोघा भावांना चिंचेच्या झाडाला बांधून त्यांचा अमानुष छळ केल्याची घटना तब्बल सहा महिन्यांनी समोर आली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच भोईवाडा पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळून पोलीस कोठडीत डांबले.
हेही वाचा - मुलींचे अश्लिल फोटो तयार करून ब्लॅकमेलींग करणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अटक
घटनेतील तक्रारदार व त्याचा भाऊ भिवंडी शहरातील टावरे स्टेडियम येथील स्विमिंग पूलमध्ये १८ एप्रिल २०१९ ला पोहण्यासाठी गेले होते. पोहून झाल्यानंतर दिवानशाह दर्गा येथून घरी जात असताना दिवानशाह परिसरात राहणारा आरोपी अस्लम हसन रजा अन्सारी (वय-२३) याने या दोघा भावांना जबरदस्तीने चिंचेच्या झाडाखाली घेऊन गेला. त्यानंतर दुसरा आरोपी नाजीम फारुकी (वय-३२) हा येऊन तलावात मासे पकडण्यास मनाई आहे असे तुम्हाला वारंवार सांगितले आहे, तरी तुम्ही मासे का पकडले असा आरोप केला.
हाफिज मुसाफ अंसारी (वय-१७) व आलीम (वय-२४) हे देखील उपस्थित होते. यावेळी अस्लम, नाजीम, हाफिज व आलीम या चौघा आरोपींनी तक्रारदार व त्याच्या भावाच्या अंगावरील कपडे काढून अश्लिल चाळे केली. हे विकृत आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी एका प्लास्टिकच्या बाटलीत साप आणून हा साप पीडित भावांच्या अंगावर सोडून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. हा व्हिडिओ २९ ऑक्टोबरला सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे मानसिक ताण वाढल्याने या दोन्ही भावांनी थेट भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्यावर सहा महिन्यांपूर्वी घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला.
भोईवाडा पोलोसांनी या अमानुष घटनेप्रकप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून या चारही जणांना अटक केली. यातील अस्लम, नाजीम, आलीम या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर हाफिज याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. जी. जोशी करत आहेत.
हेही वाचा - बारामतीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत तरुणाची आत्महत्या