ठाणे - भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच सोमवारी शहरात दहा तर ग्रामीण भागात सात असे एकूण सतरा नवे रुग्ण आढळले आहेत. या सतरा नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 158 वर पोहोचला आहे.
भिवंडी शहरातील 10 करोनाबाधित रुग्णांपैकी शहरातील खंडूपाडा येथे राहणारे 4 रुग्ण हे उत्तर प्रदेश येथे धार्मिक सभा करून आले होते. तर 2 रुग्ण हे गुजरातमधून आले होते. एक रुग्ण वंजारपट्टी नाका येथील असून आपल्या पॉझिटिव्ह कोरोनाबाधित वडिलांच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह आढळला आहे. तर एक रुग्ण राहणार फुलेनगर येथील असून केईएम हॉस्पिटल मुंबई येथे कॅन्सरचे उपचार घेताना पॉझिटिव्ह आढळला. तसेच 2 रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासातील असल्याने कोरोनाबाधित झाले आहेत. अशा प्रकारे भिवंडी शहरात सोमवारी एकूण दहा नवे रुग्ण आढळले आहेत.
या दहा नव्या रुग्णांमुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88 झाली असून त्यापैकी 39 रुग्ण बरे झाले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 47 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागातील खारबाव गावात एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या चार जणांमध्ये 32 वर्ष व 58 वर्ष वयोगटातील दोन पुरुष तर 29 वर्ष व 38 वर्ष वयोगटातील दोन महिलांचा समावेश आहे. तर कोनगाव येथे तीन नवे रुग्ण आढळले असून 65 वर्ष व 49 वर्ष वयोगटातील दोन पुरुष तर 45 वर्ष वयोगटातील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
या सात नव्या रुग्णामुळे ग्रामीण भागातील एकूण रुग्णांचा आकडा 70 वर पोहोचला आहे. तर 33 रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 36 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा आता 158 वर पोहोचला असून त्यापैकी 72 रुग्ण बरे झाले आहेत. तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 83 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.