ठाणे - माघी गणेशोत्सवच्या गणपतीच्या पुजेच्या कार्यक्रमात घरात शिजवलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. अंबरनाथ तालुक्यात दुर्गादेवीपाडा येथे हा प्रकार घडला असून, जवळपास 15 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या; नोकरीच्या आमिषाने सोडले होते घर
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना अंबरनाथ गाव दुर्गादेवीपाडा येथे मुकणे कुटूंबीयांच्या नातेवाईकांच्या घरी माघी गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने त्या निमित्ताने पुजा ठेवण्यात आली होती. या पुजेच्या जेवणासाठी विक्की मुकणे व त्यांच्या गावातील इतर कुटूंब जेवणासाठी आले होते. मात्र, दुपारच्या सुमाराला जेवल्यानंतर मुकणे कुटूंबातील व वाघे कुटूंबातील जवळपास 15 हून अधिक जणांना उलट्या व जुलाब होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात व महेश्वरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांना अधिक बाधा झाली आहे.
मुकणे कुटूंबीयांनी घरीच जेवण तयार केले होते. मात्र, ही अन्न बाधा नक्की कशामुळे झाली हे मात्र समजले नसल्याचे मुकणे कुटूंबीयांनी सांगितले. आम्हाला कोणाविरूध्दही तक्रार दाखल करायची नसून आमच्याच कुटूंबातील हा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. विषबाधा झालेल्या काही जणांवर उपचार करुन घरी पाठविण्यात आले आहेत. तर काही रूग्णालयात उपचार घेत असल्याचे विक्की मुकणे व आनंद मुकणे यांनी सांगितले.
पूजेच्या जेवणात अन्न बाधा झालेल्यांमध्ये आरुषी विक्की मुकणे (वय - 6), निखील मुकणे (वय- 9), आशा मुकणे (वय -24), गुरूनाथ (वय -35) आणि इतरांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.