ठाणे - गुलाबांची रंगीत दुनिया सध्या डोंबिवलीत अवतरली आहेत. वेगवेगळे रंग, आकार आणि सुगंधाच्या शेकडो गुलाबपुष्पांचे राज्यस्तरीय प्रदर्शन डोंबिवलीत सुरू झाले आहे. यंदाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पुण्याहून सर्वाधिक गुलाब पुष्पे आलेली आहेत. तर यंदाच्या प्रदर्शनातून 'मोदी' नावाचे गुलाब गायब झाले आहे.
हेही वाचा - नोव्हेंबरमध्ये १४ लाख ३३ हजार नव्या नोकऱ्यांची निर्मिती; ईएसआयसीचा दावा
या प्रदर्शनाचे यंदा हे ९ वे वर्ष आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांनी २०१४ मध्ये गणेशनगर येथील रोझ गार्डनमध्ये 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' नावाच्या गुलाबाचे रोप लावले होते. या उद्यानाचे उद्घाटन माजी मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. हे गुलाब डोंबिवलीत रुजले नाही, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - 'मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी अगोदर केंद्रात बिल मंजूर करा'
गुलाबांचे मनमोहक रूप, विविध रंग, डौलदारपणा, दरवळणारा सुगंध आबालवृद्धांच्या मनाला साद घालत आहेत. 'इंडियन रोझ फेडरेशन' या अखिल भारतीय गुलाबप्रेमींच्या संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात पुणे, वांगणी, शहापूर येथील गुलाब उत्पादकांनी सहभाग घेतला आहे. डोंबिवलीतील रामनगर येथील बालभवनमध्ये २६ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन रसिकांना विनामूल्य पाहता येणार असल्याची माहिती आयोजक तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.