ठाणे - आई-वडिलांसोबत रक्षाबंधनानिमित्त घणसोली येथे राहणारा वेदांत विक्रांत दास हा पाच वर्षीय मुलगा नातेवाईकांकडे जात होता. मात्र, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथे त्यांची मोटारसायकल रस्त्यामधील गॅपमध्ये अडकून पडली. यात वेदांत आणि त्याचे आई-वडील रस्त्यावर पडले. तोच पाठीमागून येणारा टेम्पो वडील व मुलाच्या अंगावरुन गेला. यात वेदांतचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या प्रेमाचा दिवस, मात्र याच दिवशी एका बहिणीला आपल्या लहान भावाला गमवावे लागले आहे. पण याला जबाबदार नियती नसून, ठाणे महानगपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांची भ्रष्ट युती जबाबदार आहे. यातील टेम्पो चालक आदिनाथ टावरे याला कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.