ठाणे - चोरी करताना चोर कोणत्याही थराला जातात हे आपण आजपर्यंत पाहिले होते. परंतु, चोरांनी पीडित व्यक्तीला चावा घेण्याचा अजब प्रकार मुंब्रा येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकापासून कल्याणच्या दिशेला काही अंतरावर पंकज सोनकर (वय 23 वर्षे, रा. मुंब्रा) युवक कामासाठी गेला होता. त्याचा दोघांनी चावा घेत मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली. त्या दोघांना रेल्वे पोलिसांना ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दोघांना न्यायलयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
निलेश गवळी आणि हारूण शेख (दोघे रा. संजयनगर, मुंब्रा), असे संशयीत आरोपींची नावे आहेत. पंकज हा कामानिमित्त मुंब्रा रेल्वे स्थानकापासून कल्याणच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी गवळी व शेख त्याच्याकडील मोबाील हिसकावण्याचा प्रयत्न करत होते. पण, पंकज सावध झाल्याचे पाहताच दोघांनी त्याच्यावर ब्लेडने वार करत त्याचा चावा घेतला. त्यानंतर त्याच्याजवळील मोबाईल आणि दहा हजार रूपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. जखमी पंकजने लागलीच मुंब्रा पोलीस ठाणे गाठत आरपीएफचे उप निरीक्षक ए.के. यादव यांना सर्व प्रकार सांगितला.
हेही वाचा - विष प्रयोग केल्यामुळे दुभत्या जनावरांचा तडफडून मृत्यू; अज्ञाताविरोधात गुन्हा
पोलीस तपास करत असताना निलेश गवळी हा संशयीतरित्या फिरताना दिसला. त्याला आरपीएफ जवानांनी पकडून त्याकडे चौकशी केली असता त्याने हारूण शेख याचे नाव सांगितले. गवळीच्या माहितीवरून शेखलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत केला. पण, दहा हजारांची रक्कम मात्र प्राप्त झाली नाही. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
हेही वाचा - रांगोळी पुसल्याच्या संशयातून 'सख्खे शेजारी झाले पक्के वैरी'; घटना सीसीटीव्हीत कैद