नवी मुंबई - पनवेल-कोळीवाडा येथील नॉन-कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्रात काल (सोमवारी) एका महिलेने बाळाला जन्म दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्भवती मातांच्या आरोग्याची होणारी हेळसांड लक्षात घेऊन नॉन-कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्राची मागणी करण्यात आली होती. पनवेल संघर्ष समितीने ही मागणी केली होती.
यानतंर यांसंदर्भात महिनाभर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जुन्या रुग्णालयात हे प्रसूती केंद्र सुरू झाले होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेलअंतर्गत हे 20 खाटांचे नॉन कोविड प्रसूती केंद्र सुरू करण्यात आले. याच केंद्रात पहिले बाळ जन्माला आले आहे. कोळीवाडा (उरण नाका) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये हे केंद्र सुरू व्हावे, म्हणून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी अथक प्रयत्न केले होते.
नवी मुंबईसह राज्यातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल (सोमवारी) 17 हजार 66 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्यात 7 लाख 55 हजार 850 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2 लाख 91 हजार 256 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.