ठाणे - भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून बुधवारी वर्षाच्या पहिल्याच दिवशी यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या भीषण आगीत कारखान्यातील लाखोंच्या कपड्यांसह यंत्रमाग मशीन जळून खाक झाले आहे. भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरातील जयेंद्र शहा यांच्या मालकीचा हा यंत्रमाग कारखाना आहे.
या यंत्रमाग कारखान्याला बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली . या आगीत कारखान्यात ठेवण्यात आलेले वारपिन आणि तयार कापडांचे गठ्ठे जळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखोंचे नुकसान झाले. कारखान्याला आग लागल्याचे समजताच कामगारांनी बाहेर पळ काढला. यामुळे, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत लाखोंचे कपडे जळून खाक झाले होते. दोन तासाच्या अथक प्रयत्नांने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आगीचे नेमके कारण समूज शकले नाही. अधिक तपास भिवंडी शहर पोलीस करीत आहेत.