ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाण पुलावर धावत्या होंडा कारने अचानक पेट घेतला. या आगीत कार जळून राख झाली. आग लागल्याचे समजताच कारमधील प्रवासी तत्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
उल्हासनगर येथील व्यापारी दिनेश हे आपल्या तीन मित्रांसह शनिवारी दुपारी कामानिमित्त मुंबईला गेले होते. काम आटोपल्यानंतर ते रविवारी सकाळी उल्हासनगरला परत जात होते. ज्यावेळी त्यांची कार माणकोली उड्डाण पुलावरून जात होती तेव्हा अचानक गाडीतून धूर निघत असल्याचे दिनेश यांच्या लक्षात आले. दिनेशने प्रसंगावधान राखूत तत्काळ कार रस्त्याच्या बाजूला उभी केली. कारमध्ये बसलेल्या सर्वांना खाली उतरवून बाजूला जाण्यास सांगितले.
हेही वाचा - व्हायरल व्हिडिओमुळे रिक्षाचालकाचं फळफळलं नशीब; 'तो' दिसला चक्क माजी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत
ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागताच कार काही क्षणातच जळून खाक झाली. या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक जि. बी. गणेशकर हे याबाबत अधिक तपास करत आहेत.