ठाणे - भिवंडीत आज पाहाटेच्या सुमारास पुन्हा एका लाकडाच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत लाखो रुपयांच्या लाकडांसह आरा मशीनही जळून खाक झाली आहे. ही घटना कल्याण-भिवंडी मार्गावरील गोवे गावाच्या हद्दीत असलेल्या ऊमया स्वॉमील नावाच्या कारखान्यात घडली आहे. मात्र, सुदैवाने आग लागली त्यावेळी कारखान्यात कामगार नव्हते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या आगीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
काही क्षणातच आगीचे भीषण रूप -
भिवंडी-कल्याण रोडवरील गोवेगाव येथील उमया स्वॉमील हा कारखाना आहे. या कारखान्याला पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली असून या आगीत लाखो रुपयांचा लाकडाचा साठा जळून खाक झाला. तर आरा मशीनही जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीने काही क्षणात भीषण रूप धारण केले होते. आगीची माहिती मिळताच भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, आगीने भीषण रूप धारण केल्याने अन्य पाण्याचे टँकरव्दारे ही आग विझवण्याचे काम अग्निशमन दलातर्फे करण्यात येत होते. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही भीषण आग आटोक्यात आली.
हेही वाचा - खासदार डेलकर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिला भाजपला इशारा