ठाणे - प्रभारी गटशिक्षण अधिकारी असलेल्या एका लंपट अधिकाऱ्याने महिला विस्तार अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कार्यलयात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शहापूर पोलीस ठाण्यात त्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशिष झुंझारराव असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या विनयभंगाच्या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून, महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या ५ वर्षांपासून पीडित महिला अधिकारी या लंपट अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासामुळे त्रस्त झाल्या होत्या. यामुळे पीडित महिलेने यापूर्वी शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लंपट झुंझारराव विरोधात लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र तिथून त्यांना न्याय मिळत नसल्याने या वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून अखेर महिला अधिकाऱ्याने पोलिसांत धाव घेऊन प्रभारी गटशिक्षण अधिकारी झुंझारराव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच लंपट झुंजारराव हा फरार झाला. शहापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे विनयभंग झालेल्या पीडित महिला अधिकारी यांनी आरोपी अधिकाऱ्यांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी टी. ओ. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. शिक्षणाधिकारी गुन्हा दाखल असलेल्या झुंजारराव याच्या विरोधात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात तो लंपट अधिकारी पीडित महिला अधिकाऱ्यांना कार्यालयात कोणतेही काम न देणे, नाहक बसवून ठेवणे, पैशांची मागणी करणे, तसेच अश्लील वक्तव्य करून शरीर सुखाची मागणी करून मानसिक आणि लैंगिक छळ करत असल्याने पीडित महिला अधिकाऱ्याने शहापूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी अधिक तपास महिला पोलीस नाईक शुभांगी उघडे करीत आहेत.