मीरा भाईंदर (ठाणे) - शहरात खासगी शाळेच्या फीवाढी विरोधात कारवाई होत नसल्याने तसेच शिक्षण हक्क कायदा २००९ बालकांच्या मोफत आणि शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार कारवाई होत नसल्याने 'फाईट फॉर राईट' या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजू विश्वकर्मा यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज (शुक्रवारी) पाचवा दिवस आहे. जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, असा इशारा आंदोलक राजू विश्वकर्मा यांनी दिला.
कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयांचा एकही वर्ग भरलेला नाही. वर्ग बंद आहेत. मात्र, तरी शाळा आणि महाविद्यालयांनी फी वसुलीचा सपाटा लावला आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली काही शाळांनी जास्त फी घेण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षाची फी भरण्यासाठी खासगी शाळांच्या व्यवस्थापनाने पालकांवर दबाव निर्माण केला आहे. याबाबतच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात आलेल्या आहेत.
याप्रकरणी विश्वकर्मा यांनी जानेवारीमध्ये या अगोदर आंदोलन व उपोषण करण्यात आले होते. याप्रकरणी राजू विश्वकर्मा यांनी पालिका आयुक्तांना शिष्टमंडळाद्वारे शहरातील शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाची भेट घेऊन मनमानी पद्धतीने फीवसुली थांबवण्याची मागणी केली. पालकांची छळवणूक करून ही फीवसुली सुरू ठेवल्यास, संस्थेच्या विरोधात करण्याचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे विद्यार्थी घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र, तरीही काही शाळांनी वार्षिक फीमध्ये ग्रंथालय शुल्क, क्रीडा शुल्क, जलतरण तलावाचे शुल्क आणि अन्य शिक्षणेतर उपक्रमांचे शुल्क पालकांच्या माथी मारले जात आहे. ही एक प्रकारची आर्थिक लूट असल्याचा आरोप विश्वकर्मा यांनी केला. ही लूट तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
आम्ही शैक्षणिक संस्थाना सक्त आदेश दिले आहेत की त्यांनी त्या-त्या संस्थांनी शिक्षणाचा कायद्यानुसार पाल्यांना दाखला द्यावा व आताच्या काळात खासगी शाळांनी फी वाढवू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी दिला.