ठाणे: सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील पैलवान ऐश्वर्या भगवान सणस हिने ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. तर भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा येथे राहणारी राष्ट्रीय कुस्तीगीर पैलवान गौरी चंद्रकांत जाधव हिने ६८ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील पैलवान अमेघा अरुण घरत हिने ५९ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीच्या स्पर्धेतील मॅट (गादी) कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत वैष्णवी पाटील हिची लढत सांगलीची पैलवान प्रतीक्षा बागडीमध्ये झाली. यामध्ये प्रतीक्षा बागडी हिने कल्याणच्या वैष्णवीचा निसटता पराभव करून पहिली महाराष्ट्र केसरी महिला कुस्तीच्या गदावर स्वत:चे नाव कोरले.
वैष्णवीला बालपणापासूनच कुस्तीची आवड: पैलवान वैष्णवी पाटील ही ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असलेल्या मांगरूळ गावची निवासी आहे. ती कल्याण तालुक्यातील नांदिवली गावातील 'जय बजरंग तालीम'मध्ये कुस्तीचे धडे शालेय जीवनापासूनच घेत आहे. या तालमीत तिचे उस्ताद पंढरीनाथ ढोणे आणि वसंत साळुंखे हे असून यांच्याच मार्गदर्शनाखाली ती कुस्तीचा सराव करीत आहे. लहानपणापासूनच कुस्तीची आवड आणि आतापर्यंत सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारी पैलवान आहे. वैष्णवी पाटील हिला वडील दिलीप पाटील आणि आई पुष्पा पाटील यांच्याकडून पैलवानकीसाठी प्रोत्साहन मिळाले. तिने विशाखापट्टणम येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 'सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप ब्राँझ' पदक जिंकले आहे. कुस्तीगीर पैलवान वैष्णवी दिलीप पाटील हिने ७६ किलोच्या वरील गटात रौप्यपदक जिंकून पहिली महिला उप महाराष्ट्र केसरीचा मान मिळविला.
तर वैष्णवी रचणार इतिहास: ठाणे जिल्ह्यातील महिला कुस्तीगीरांनी नेत्रदीपक कामगिरी करत चार पदके जिंकली. यासह पहिली महिला उप महाराष्ट्र केसरी पैलवान वैष्णवी पाटील भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्ती, राष्ट्रकुल स्पर्धेत, ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून एक नवा इतिहास रचेल आणि ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव उज्वल करणार, असा विश्वास राष्ट्रीय पंच, कुस्ती मार्गदर्शक डॉ. प्रा. विनोद हनुमान पाटील कोनकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: Bacchu kadu: माझी आमदारकी गेली, तरी मी आनंद साजरा करेन; बच्चू कडू यांचे प्रत्युत्तर