ठाणे : ११ वर्षीय अल्पवयीन मुलाची बापानेच हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील एका चहाच्या टपरी मागे फेकल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात बापावर हत्येसह पुरावा नस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे. आनंदकुमार गणेशन (वय ४० ) असे अटक केलेल्या आरोपी बापाचे नाव आहे. तर आकाश असे निर्घृण हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
मृतदेह टपरीमागे फेकला : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामी नगरमध्ये आरोपी आनंदकुमार गणेशन राहतो. त्याला तीन मुले असून त्यापैकी मृतक आकाश होता. तर, आरोपी हा पत्नीपासून विभक्त राहत होता. त्यातच बुधवारी रात्रीच्या सुमारास आरोपी बापाने आकाशची हत्या केली. नंतर गुरुवारी पहाटे परिसरात एका चहाच्या टपरी मागे त्याचा मृतदेह फेकून दिला.
मृतदेह टाकून काढला पळ : काही नागरिकांनी आरोपी आनंदकुमार याला मुलाचा मृतदेह टाकताना पाहिले आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने मृतदेह टाकून पळ काढला. काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मुलाचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला.
आरोपी बापाला अटक : आरोपी विरोधात (आज) गुरुवारी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे. आरोपी आनंदकुमार गणेशन हा गटार साफ करायचे काम करत होता. तर, मृतक आकाश हा अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रीचे काम करत होता. मात्र, त्याने आपल्याच पोटच्या अल्पवयीन मुलाची इतक्या निर्दयपणीं हत्या का केली? याचे कारण अद्यापही समोर आले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - Mumbai Crime: पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियर बनला हॅकर; नवरोबाला यूपीहून अटक