ठाणे - रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या दोन दुचाक्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर-शेणवे मार्गावर घडली असून या भीषण अपघात दुचाकीवरील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला आहे. गणपत रिकामे ( वय ६५ वर्ष ) नितीन रिकामे ( वय ३५ वर्ष ) असे अपघातात ठार झालेल्या बाप लेकाची नावे आहेत. तर यतीन पानसरे असे गंभीर झालेल्या युवकाचे नाव आहे.
दोन्ही दुचाक्यांचा चेंदामेंदा -
शहापूर तालुक्यातील रानविहीर गावात राहणारे गणपत रिकामे आणि त्यांचा मुलगा नितीन आज (सोमवारी) दुपारच्या सुमारास कामा निमित्ताने शहापूर शेणवे मार्गावरून दुचाकीवरून जात होते. त्याच सुमाराला समोरून यतीन पानसरे हा युवक दुसऱ्या दुचाकी भरधाव येत असतानाच, या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही दुचाक्याचा समोरील भाग चेंदामेंदा होऊन या अपघातात बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला.
जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक -
शहापूर तालुक्यातील कळंबे गावात राहणारा यतीन पानसरे हा दुसऱ्या दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला असून त्याला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत बाप लेकाचे मृतदेह शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले. मात्र याघटनेमुळे रानविहीर गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - खड्डा चुकविण्याच्या नादात भीषण अपघात; सख्ख्या बहीण-भावासह चार ठार, एक गंभीर