ठाणे - पत्नीशी मानलेल्या मुलाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून या मुलाचा कायमचा काटा काढण्यासाठी चाकूच्या साह्याने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या हल्लेखोराला डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत गुजरातच्या सीमेवर जेरबंद केले आहे. पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने मोबाईलमधील सिमकार्ड बदलून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या पथकाने अत्यंत चपळाईने या हल्लेखोर पतीच्या मुसक्या गुजरातच्या सीमेवर आवळल्या.
पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल -
बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पश्चिम डोंबिवलीत विचित्र घटना घडली होती. जन्म दिलेला असो वा मानलेला मुलगा असो, तथापि आपल्या पत्नीचे मानलेल्या मुलाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या पतीने या मुलाचा कायमचा काटा काढण्यासाठी त्याचे मुंडके धडावेगळे करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोराने तेथून पळ काढला. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने हा मुलगा बचावला. सद्या हा मुलगा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपला मानलेला मुलगा अशिष जानवेद यादव (23) याला ठार मारण्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या पतीच्या विरोधात पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी हल्लेखोराच्या विरोधात भादंवि कलम 307, 506 अनव्ये गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा -प्रियंका गांधींच्या संघर्षाने दिल्लीही झोपली नसावी, रोखठोक'मधून राऊतांचा भाजपवर हल्ला
पत्नीच्या जीवालाही होता धोका -
हा अपराध अत्यंत गंभीर असल्याने, तसेच यातील तक्रारदार ही हल्लेखोराची पत्नी असून तिच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे फरार हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रात्रीचा दिवस करून शोध मोहीम सुरू केली. फरार हल्लेखोराने त्याचा मोबाईल तात्काळ बंद केल्यामुळे त्याचे लोकेशन मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. मोबाईल बंद केल्यानंतर शेवटच्या लोकेशनच्या आधारे त्याचा माग काढत पोलिसांचे पथक त्याच्या मूळ गावी रत्नागिरीकडे निघाले. मात्र हल्लेखोर इतका चलाख होता. त्याने अचानक नवीन सिमकार्ड टाकून मोबाईल चालू केला व एक कॉल करुन पुन्हा मोबाईल बंद केला. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
हे ही वाचा -...तर १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संप, पालिका कर्मचाऱ्यांचा इशारा
मोबाईल लोकेशनमुळे आरोपीचा लागला ठावठिकाणा -
फरार हल्लेखोराचा ठावठिकाणा अर्थात मोबाईल लोकेशन गुजरात राज्याच्या सिमेलगत असलेल्या पालघर जिल्ह्यात डहाणूजवळ असलेल्या घोलवड गावच्या आसपास आढळून आले. पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून तात्काळ आपल्या गाड्या फिरवल्या आणि हे पालघरच्या दिशेने निघाले. त्यामुळे हल्लेखोर गुजरातच्या सीमेवर सापडला. पोलिसांना थोडा जरी उशीर झाला असता तर मात्र हल्लेखोर गुजरात राज्याची सीमा ओलांडून अन्यत्र बेपत्ता झाला असता. मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरून हल्लेखोराचा पळून जाण्याचा मनसुबा उधळून लावल्याबद्दल कल्याण परिमंडळ 3 चे उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवलीचे विभागीय आयुक्त जय मोरे यांनी या पथकाचे कौतुक केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि राहुल खिलारे करत आहेत.