ठाणे - कॅडिलॅक, बेंटली, फोर्ड, कार चाहत्यांची लाडकी फरारी, शाही दिमाख मिरवणारी रोल्स रॉयस, डोळे दिपवणारी लम्बोर्गिनी यांसारख्या अनेक व्हिंटेज आणि सुपरकार याची देही याची डोळा एकत्रित पाहण्याची सुवर्णसंधी ठाणेकरांना आज प्रजासत्ताक दिनी मिळाली. ठाणे वाहतूक शाखेच्यावतीने सुरू असलेल्या ‘रस्ता सुरक्षा जीवन रक्षा’ या मोहिमेअंतर्गत ऐतिहासिक, आधुनिक आणि सुप्रसिद्ध वाहनांचे भव्य संचलन ठाण्यात आज संपन्न झाले.
हेही वाचा - सृष्टीचे स्वप्न साकारणार का? नॉनस्टॉप 24 तास लावणीला सुरवात
रेमंड कंपनी येथून निघालेली ही रॅली शास्त्री नगर, उपवन, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, खेवरा सर्कल, टिकुजिनीवाडी – मानपाडा, ब्रम्हांड , पातलीपाडा ,हिरानंदानी इस्टेट पर्यंत ही रॅली निघाली. त्यानंतर युटर्न घेत घोडबंदर रोड मार्गे कापुरबावडी, माजिवडा, मिनाताई ठाकरे चौक, पोस्ट ऑफिसमार्गे कोर्ट नाका, मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन, चिंतामणी ज्वेलर्स, टेंभीनाका - आंबेडकर रोड - खोपट – कॅडबरीमार्गे पुन्हा रेमंड कंपनीच्या मैदानात रॅलीची सांगता झाली, या रॅलीमध्ये ४० व्हिंटेज कार्ससह ३० सुपर कार्स आणि मोटारसायकलस्वार सहभागी होऊन २० किलो मीटर संचलन करण्यात आले. या रॅलीचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे देखील उपस्थित होते.
जुन्या काळातील या विंटेज गाड्या आणि त्यांची केलेली देखभाल खरंच पाहण्यासारखी होती. या कार्यक्रमाला आलेले ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विंटेज गाड्या पहिल्या आणि कौतुक केले. एवढेच नाही तर, त्यांनी एका कारमध्ये बसून त्या कारचा आनंदही घेतला.
हेही वाचा - येरवडा जेल टुरिझममध्ये गांधी यार्ड, टिळक यार्ड, फाशी यार्ड पाहता येणार