ग्वाल्हेर IND vs BAN 1st T20I : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना रविवारी, 6 ऑक्टोबर रोजी येथील न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताकडून डावाची सुरुवात कोण करणार हा एक मोठा प्रश्न आहे. वास्तविक, भारतीय संघात केवळ 1 विशेषज्ञ सलामीवीराचा समावेश करण्यात आला आहे.
कोण करणार डावाची सुरुवात : डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा हा भारतीय संघातील एकमेव सलामीचा फलंदाज आहे. त्याच्याशिवाय संघात दुसरा सलामीचा फलंदाज नाही. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या स्टार सलामीवीरांना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात कोण करणार? याचं उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे.
3 खेळाडू करु शकतात डावाची सुरुवात :
सूर्यकुमार यादव : भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. सूर्यानं याआधीही अनेक वेळा डावाची सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत अभिषेक शर्मासोबत सूर्याही सलामीचा दावेदार मानला जात आहे. सूर्यानं T20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 4 वेळा सलामी दिली आहे आणि 1 अर्धशतकासह एकूण 135 धावा केल्या आहेत.
संजू सॅमसन : सूर्यकुमार यादवशिवाय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनही अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करु शकतो. संजूनं याआधीही अनेक वेळा T20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी डावाची सुरुवात केली आहे. 5 सामन्यांमध्ये डावाची सुरुवात करताना त्यानं 1 अर्धशतकाच्या मदतीनं 105 धावा केल्या आहेत.
वॉशिंग्टन सुंदर : यांच्याव्यतिरिक्त भारतीय संघाचा ऑफस्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरही अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करु शकतो. सुंदरनं याआधी T20 मध्ये भारतासाठी कधीही डावाची सुरुवात केली नव्हती, परंतु त्यानं एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली होती, ज्या सामन्यात त्यानं 18 धावा केल्या होत्या.
हेही वाचा :