ठाणे - बदलापूर नगर परिषदेने मे महिन्याच्या अखेरीस शहरातील मोठ्या नाल्याची साफसफाई केली. मात्र नालेसफाई केल्यानंतर नाल्यातून काढलेला गाळ तसाच नाल्याशेजारी ठेवण्यात आल्याने हा गाळ पुन्हा नाल्यात जात असल्याने पालिकेने नालेसफाईचा केलेला दावा फोल ठरला आहे. याकडे संबंधीत आधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे नालेसफाईवर झालेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे यंदाही पावसाळ्याच्या दिवसात बदलापुरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नाल्यालगतच्या सखल भागात पाणी-
बदलापूरात कात्रप व शिरगाव येथून येणाऱ्या दोन मुख्य नाल्यांसह इतर लहानमोठे शहरात नाले आहेत. त्यातच कात्रप व शिरगाव येथून येणारे दोन मुख्य नाले रेल्वे उड्डाणपुलाखाली एकत्र मिळतात आणि बदलापूर पश्चिमेकडील मांजरली, हेंद्रेपाडा आदी भागातून जाऊन उल्हासनदीला मिळतात. पावसाळ्यात जोरदार पाऊस होऊन नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर स्वाभाविकपणे या नाल्यातील पाण्याची पातळीही वाढत असते. त्यामुळे अनेकदा या नाल्यालगतच्या सखल भागात पाणी शिरून हे भाग जलमय होत असतात.
नालेसफाईचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात -
कुळगाव - बदलापूर नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरातील नालेसफाई करून त्यातील गाळ काढण्यात आला. नाल्यातून बाहेर काढलेला गाळ हा नाल्याच्या शेजारीच टाकला आहे. पावसाच्या पाण्यामुळे हा गाळ पुन्हा नाल्यात जात आहे. याकडे संबंधीत आधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे नालेसफाईवर झालेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. संबंधित काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी याबाबत खातरजमा करणे गरजेचे होते. मात्र कार्यालयात बसूनच नालेसफाईचा दावा हे अधिकारी करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हा गाळ पुन्हा नाल्यातच जात आहे.
राहिलेल्या नाल्यातील गाळ काढण्यात येईल -
या बाबत स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होत्या. त्यावेळी जूनच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाई करून नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. एखाद्या नाल्याच्या ठिकाणी गाळ राहिला असेल तर तो गाळ काढण्यात येणार आहे. असे कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या प्रमुख वैशाली देशमुख यांनी सांगितले.