ठाणे : जावयाला दोन बायका असून सासूच्या कटकटीपाई ( Quarrel with mother-in-law ) दुसरी बायको घरातून निघून गेली. याच वादातून सासूला अपहरणाच्या गुन्ह्यात ( Offenses of Kidnapping ) अडविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा जावयाने बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ( Kolsevadi Police Station ) जावयासह चौघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. संदीप गायकवाड असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे. तर जावेद खान, आकाश अभंग, अवि पाटील असे अपहरण नाट्यात जावयाला मदत करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हा दाखल - कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका परिसरात आरोपी संदीप हा दोन बायकासह राहतो. विशेष म्हणजे दोन्ही बायका वेगवेगळ्य़ा धर्माच्या असून दोन बायकापैकी एकीने अचानक संदीपची साथ सोडून निघून गेली. त्यामुळे संदीप कुटूंबातील कलहमुळे तणावात होता. त्यानंतर १४ ऑक्टोंबर रोजी आरोपी संदीपची एक बायको नवऱ्याचे अपहरण झाले. कल्याण पूर्वेतील जे. पी रोडवर वरील गॅस कंपनी बाहेर दुचाकी घेऊन उभे असताना त्यांचे तीन अज्ञात व्यक्तीने मारहाण करून जबरदस्तीने एका रिक्षातुन अपहरण केल्याची तक्रार दिली. बायको सुनीताच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिस ठाण्यात भादवि कलम ३५६, ३२३, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला.
अपहरणाचा बनाव - कोळसेवाडी पोलिस ठण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी हरीदास बोचरे दिनकर पगारे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. ज्या परिसरातून संदीपचे अपहरण झाले होते. त्या भागातील सर्वच सीसीटीव्ही फुटजे पोलिसांनी तपासले. त्यामधील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिक्षाचा नंबर दिसून आला. त्यानंतर रिक्षाचा मालकाचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता. घटनेच्या दिवशी आरोपी जावेद, अवी या दोघांनी रिक्षा मालक आकाशकडून त्या दिवशी भाड्याने घेतल्याचे समोर आले. हा धागा पकडून पोलिसांनी अपहरण दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशीत संदीपचे अपहरण नसून अपहरणाचा बनाव केल्याचे समोर आले. मात्र जोर्पयत संदीप भेटत नाही. तोर्पयत पोलिसांनी अपहरणाचा तपास सुरु ठेवला.
रिक्षातून अपहरणचा बनाव रचला - पोलिस अधिकारी दिनकर पगारे यांच्या पथकाने संदीप गायकवाडला शहापूर तालुक्यातून शोधून काढत त्याच्याकडे चौकशी केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली होती. संदीप याच्या दोन बायका आहेत. त्यापैकी दुसरी बायको तिच्या आईच्या कटकटीमुळेच संदीपला सोडून निघून गेल्याने हाच राग संदीपच्या मनात होता. त्याचा राग काढण्यासाठी सासूला गुन्ह्यात अडकवून तिला धडा शिकविण्यासाठी त्याने बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली. विशेष म्हणजे ज्या रिक्षातून अपहरणचा बनाव रचला होता. त्याच रिक्षात बसल्यानंतर आरोपी संदीपने बुरखा घालून तो दुचाकीवरून साथीदारांसह निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी अपहरणाचा बनाव करणाऱ्या जावायासह त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.