ठाणे: शुक्रवारी आव्हाडांनी आपल्या ट्विटवर ऑडिओ, व्हिडिओ पुरवणारा कर्तकर्विता समोर आणून महेश आहेर यांचे कारनामे पुन्हा बाहेर काढले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणि त्याच्या कुटुबीयांना मारण्याची सुपारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिली होती असा थेट आरोप आव्हाडांनी केला. एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पालिका मुख्यालयाबाहेर आहेर यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान आव्हाड यांनी अधिवेशनात मुद्दा उचलून धरत आहेर प्रकरणाची राज्य सरकारने दखल का घेत नाहीत? असा सवाल उपस्थित करत ट्विटवर अनेक व्हिडीओ, ऑडिओ क्लिप बाहेर काढल्या. या सर्व क्लिप सुशांत सुर्वे यांनीच केल्या असल्याची कबुली स्वतः सुर्वे यांनी दिली. यामध्ये महेश आहेर कसे क्रूर आहेत आणि आ. आव्हाड यांना संपवण्याचा कट रचला जात असल्याचे सुर्वे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.
ऑडिओमधील आवाज आहेर यांचाच असल्याचा दावा: यामध्ये स्पष्टपणाने कबुली देत जे भाष्य आव्हाड यांच्या मुलीबद्दल महेश आहेर याने केलेले आहे ते भाष्य आणि त्यांचे संपूर्ण रेकॉर्डिंग त्याने स्वतः केलेले आहे. त्यामुळे या ऑडिओमधील आवाज आहेर यांचाच असल्याचा दावा सुर्वे यांनी केला आहे. महेश आहेर यांच्या बरोबर १८ तास घालवत होतो. त्यामुळे मला त्याचे सर्व कारनामे माहीत असून आहेर यांनी केलेले घरांचा घोटाळे देखील मला माहीत असल्याने सुर्वे यांनी सांगितले आहे. दरम्यान पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून पोलीसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले असल्याचे माहिती सूत्रांनी दिली.
सीआयडी-गुन्हे शाखेचा ससेमिरा: ऑडिओ क्लिप आणि धमकी प्रकरणी सीआयडी तर घरघोटाळा, पैशाचा व्हिडीओ, प्रमाणपत्र प्रकरणी महेश आहेर यांच्यामागे सीआयडी आणि गुन्हे शाखेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागलेला आहे. याचाच एक भाग म्हणून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना गुरुवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावून दीड तास चौकशी करण्यात आली. मात्र आहेर हे चौकशीला सहकार्य करीत नसल्याचे पोलीस सूत्रांची माहिती आहे. तर गुन्हे शाखा आता त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र १० वी आणि १२ वी यांची मूळ कागदपत्रे तपासणार आहेत. तर दुसरीकडे डायघर आणि मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या सदनिका विक्री वादग्रस्त प्रकरणात ठाणे गुन्हे शाखा कागदपत्र जमा करीत आहे.
हेही वाचा: CM On Farmers Issue : आदिवासी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समिती गठीत; एक महिन्यात अहवाल घेऊन कार्यवाही करणार - मुख्यमंत्री