ठाणे - राज्यात लॉकडाऊनमुळे मद्यपींची मोठी अडचण झाली होती. राज्यात सर्वच प्रकारची मद्यविक्री दुकाने जवळपास दोन महिने बंद होती. या दरम्यान ठाण्याच्या सिडको परिसरातील युवराज वाईन्सच्या मालकानी 29 एप्रिल आणि 7 मे ला रात्री दारू विक्री केली. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसच येथे मद्य खरेदी करण्यासाठी आले होते.
रात्रीच्या वेळेला पोलीस स्वतः सरकारी गाडीतून मद्य घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या वाईन शॉप पासून केवळ 500 मीटर अंतरावर कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने हा परिसर सील करण्यात आलेला होता. मात्र, तरीही येथे मद्य विक्री कशी करण्यात आली असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला होता. हा प्रकार ईटीव्ही भारतने समोर आणला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दुकानावर कारवाई करत दुकान सील केले. दुकानात असलेले सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.