ठाणे - मुंबई पोलीस दलात असताना सर्वाधिक गुंडांना मारणारे ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी बुधवारी पोलीस दलातील सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला. तब्बल 113 गुंडांचा एन्काऊंटर करणारे शर्मा लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. अंधेरी, साकीनाका नाहीतर नालासोपारा येथील विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांचा बहुतांश कार्यकाळ हा मुंबईतील गुन्हे शाखा अथवा विशेष दलात गेला आहे. दोन वर्षांपासून ते ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. शर्मा सहा महिन्यानंतर निवृत्त होणार होते. मात्र, त्यापूर्वीच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शर्मा इच्छुक असल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याचे कळते. गेल्या ४ जुलै रोजी शर्मा यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केला होता. युतीमधील अनेक वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने त्यांचा राजकारणप्रवेश सुकर मानला जात आहे.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट शर्मा -
लष्करे 'तोयबा'च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुप्रसिद्ध गुंडांचा एन्काऊंटर शर्मा यांनी केला होता. गेल्या सहा महिन्यांपूर्वी एका खंडणी प्रकरणात त्यांनी थेट कुप्रसिद्ध दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर यालाही अटक केली होती.
अंधेरी, साकीनाक्यातून उमेदवारी?
अंधेरी आणि साकीनाका परिसरात त्यांचे सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून या दोनपैकी एका मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह केला जात आहे. मात्र, त्याचवेळी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवताना त्यांना नालासोपाऱ्यातूनही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. वसई व नालासोपारा परिसरात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे एकहाती वर्चस्व आहे. या वर्चस्वाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात युतीकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुंबईचे आयुक्त म्हणून काम केलेल्या सत्यपाल सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ आता शर्माही राजकारणाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.