नवी मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे सोमवारी निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात स्टॅन स्वामी आरोपी होते. त्यांना रांची येथून ९ ऑक्टोबर २०२०ला अटक करण्यात आली होती. जेलमधील अपुऱ्या सुविधांबाबत स्वामी व त्यांचे सहकारी आरोपी यांनी जेल प्रशासनाला वारंवार तक्रारी दिल्या होत्या. मात्र, जेल प्रशासनाने याकडे काना डोळा केला होता. त्यामुळे स्वामी यांचे आरोग्य ढासळत गेले व अखेर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी आरोपींनी केला होता. त्यामुळे एल्गार परिषदेचे आरोपी यांनी तळोजा जेलमध्ये आंदोलन छेडले. मात्र, या वृत्ताला तळोजा जेलचे जेलर कौस्तुभ कुर्लेकर यांनी दुजोरा दिला नाही. तसेच असे आंदोलन झाले आहे हे माझ्या ऐकण्यात नाही, असेही जेलर कुर्लेकर यांनी सांगितले.
रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा मी जेलमध्ये खितपत मृत्यू पत्करेन :
मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यावर २ मेला स्वामीं यांना तळोजा मध्यवर्ती कारागृहातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयामध्ये दाखल होण्यापेक्षा मी जेलमध्ये खितपत मरेल, असेही स्वामी यांनी म्हंटले होते. कोरोनामधून बरे झाल्यावर देखील स्वामीं यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईमधील हॉली फॅमिली रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र, त्यांचे ५ जुलैला निधन झाले. स्वामी व एल्गार परिषद प्रकरणातील त्यांचे सहकारी आरोपी यांनी तळोजा जेलमधील आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याच्या वारंवार तक्रारी केल्या होत्या.
जेलर कौस्तुभ कुर्लेकर यांचा आंदोलनाच्या वृत्तास दुजोरा नाही -
याप्रकरणी जेलर कौस्तुभ कुर्लेकर यांना विचारणा केली असता, एल्गार परिषदेतील आरोपींनी तळोजा कारागृहात अशा प्रकारे आंदोलन केले नसल्याचे सांगितले असून, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला नाही.