ठाणे - कोरोनाच्या महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ठाण्यात देखील प्रशासन जोरदार प्रयत्न करत असून एक हजार बेड क्षमता असलेल्या रुग्णालयाचे काम जोरात सुरू आहे. येत्या काही दिवसातच हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत येईल, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
बाळकूम येथील विस्तीर्ण मैदानावर सध्या या रुग्णालयाचे काम सुरू आहे. ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या या रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या रुग्णालयातील 500 बेडला ऑक्सिजनची सुविधा असेल असून अतिदक्षता विभागाचीही निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
या आढावा बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे प्रमुख आर. ए. राजीव, महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीचे पदाधिकारी आणि अधिकारी हजर होते.