ठाणे - महावितरणच्या उल्हासनगर उपविभागातील लालचक्की शाखा कार्यालयात जुगार खेळणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या आठ कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना तीन पत्ती आणि रमीचा डाव मांडला होता. आठ पैकी सात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून एका कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात आले आहे.
वरिष्ठ तंत्रज्ञ टिकेकारा ओसेफ फ्रान्सिस, तंत्रज्ञ निखिल पांडूरंग पवार, महेश नारायण कळसईतकर, विद्युत सहाय्यक इलमोद्दीन मेहबूब शेख, संतोष मधुकर भोसले, मंगेश नंदू वानतकर, कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यक विनोद तुकाराम बोबले, कंत्राटी कामगार सुनील पांचाळ अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ३० नोव्हेंबरला हे कर्मचारी कार्यालयातील कनिष्ठ अभियंता कक्षात जुगार खेळताना आढळून आले.
हेही वाचा - मुंबई : महापरिनिर्वाण दिनासाठी सोयी सुविधांसह महापालिका सज्ज
निलंबन कालावधीत या कर्मचाऱ्यांना जव्हार आणि मोखाडा उपविभागीय कार्यालयात हजेरी देण्याचे आदेश दिले आहेत. कामावर असताना कर्मचाऱ्यांचे कोणतेही गैरवर्तन सहन केले जाणार नाही. गैरवर्तन गांभीर्याने घेऊन कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.