ठाणे Youth Dies Due To Electric Shock: ईद मिलाद-उन-नबीच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षी प्रमाणे रझा अकादमी भिवंडी आणि ईद मिलाद ट्रस्ट यांच्या वतीने 19 वीं वार्षिक मिरवणूक मोठ्या थाटामाटात कोटर गेट येथून काढण्यात आली. मात्र, आज (शुक्रवारी) दुपारच्या सुमारास एका तरुणाच्या हातातील उंच बांबूवरती स्टीलचे चांद तारा असा झेंडा होता. हाच झेंडा विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे तो राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. अशफाक शेख (वय 21, रा. पिरानी पाडा, भिवंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
उंच झेंडा फडकवणे बेतले जीवावर: मिळलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील पिरानी पाडा परिसरातून ईद मिलाद-उन-नबीच्या जुलूसमध्ये शेकडो तरुण सहभागी झाले होते. त्यामध्ये पिरानी पाड्यात राहणारा अशफाक नामक तरुण हातात उंच झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत होता. या दरम्यान त्याच्या हातातील उंच बांबूवरती स्टीलचे चांद तारा असा झेंडा होता. तो मिरवणुकीत सहभागी होऊन झेंडा हवेत फडकावत असतानाच त्याच्या हातातील स्टीलचा भाग रस्त्यावरील विद्युत वाहिनीच्या तारेच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार झटका लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिरवणुकीचा उत्साह बदलला दु:खात: युवकाच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडताच त्या भागातील वीजपुरवठा काही काळ खंडित करून पुन्हा सुरू करण्यात आला. अशफाकचा जागीच मृत्यू झाल्याने त्याला रुग्णवाहिकेतून भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रवाना केला. या घटनेनंतर मिरवणुकीत शोक व्यक्त करण्यात आला. मृत अशफाक राहत असलेला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिरवणुकीची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली होती. तर या मिरवणुकीत भिवंडी शहरातील सुमारे २ ते ३ लाख मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
मिरवणूक काढताना काळजी घेणे गरजेचे: मिरवणूक काढताना किंवा घराचे बांधकाम करताना धातूचा कुठलाही पदार्थ विद्युत वाहिनीच्या संपर्कात येणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेणे गरजेचे असते. वीज वितरण विभागाकडूनही याबाबत सूचना दिल्या जातात. तरीही अनेकदा उत्साहाच्या भरात दुर्घटना घडतात. अलीकडे राज्यात गणपतीच्या मिरवणुकीतही अशीच एक घटना घडली होती. त्यामुळे मिरवणूक काढताना झेंडे विद्युत वाहिनीच्या संपर्कात येणार नाही, इतक्याच उंचीचे असावे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आमदारासह पोलिसांचाही समावेश: मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांनी हातात हिरवे झेंडे घेऊन जोरदार घोषणा दिल्या. मोहम्मद शकील रझा, अध्यक्ष, रझा अकादमी, भिवंडी यांनी मिरवणुकीच्या सूचनांची माहिती उपस्थितांना दिली. मुहम्मद शरजील रझा कादरी यांनी आयत करीमाचे पठण केले. ज्याद्वारे शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. मिरवणुकीचे काएद हजरत मौलाना तौसिफ रजा खान किब्ला (बरेली शरीफ) यांचे पुष्पहार आणि हार घालून स्वागत करण्यात आले. तर आमदार रईस शेख, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळेसह सर्वच राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी सहभागी झाले. दरम्यान हजरत मौलाना तौसिफ रजा खान यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचे आशीर्वाद घेतले. कैदच्या प्रार्थनेने मिरवणूक सुरू झाली.
पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिन: ही मिरवणूक कोटरगेट येथून सुरू होऊन वंजारपट्टी नाका येथून निजामपुरामार्गे मामू भांजा मैदानावर आली. मिरवणुकीला परवानगी मिळवण्यासाठी शकील रझा यांच्या १२ वर्षांच्या सेवेचा उल्लेख पुस्तकात आहे. यावेळी हजरत अल्लामा मौलाना तौसिफ रजा खान किब्ला म्हणाले की, ईद मिलाद हा मुस्लिमांचा प्रमुख सण आहे. या दिवशी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे पैगंबर मुहम्मद यांचा जन्म झाला, नंतर कैदच्या नमाजाने मिरवणूक काढण्यात आली.
पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त: मिरवणुकीत रझा अकादमी भिवंडीचे सदस्य आणि ईद मिलादुल-नबी ट्रस्टचे सदस्य मिरवणुकीत उमामा शरीफ यांची वेगळी ओळख दिसून आली. ते डोक्यावर बॅज घालून मिरवणूक व्यवस्था आणि उत्कृष्ट संघटनेचा दाखला देत दिसले. या ऐतिहासिक मिरवणुकीसाठी पोलीस विभागाने आपले कर्तव्य बजावले आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर वाहतूक व मिरवणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलीस विभागाने चोख व्यवस्थापन केले.
हेही वाचा: