ठाणे Thane Crime : दुर्गाडी पुलावर धारदार चाकूनं ( Dumper drivers murder Case) हत्या करून दोन हल्लेखोर फरार झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत हल्लेखोरांचा शोध घेतला. त्यानंतर दोन्ही हल्लेखोरांना वांद्रे रेल्वे स्थनाकात सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालक भोलाकुमार हा भिवंडीहून डंपर घेऊन सोमवारी पहाटेच्या सुमारास दुर्गाडी चौकातून शहाडच्या दिशेने जात होता. मात्र दुर्गाडी पुलावरच त्याच्या डंपरच्या टायरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे पुल संपण्याआधीच रस्त्यात डंपर उभा करून चालक टायर बघत होता. त्याच सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी रस्त्यात ट्रक उभा केल्यानं वाहन चालकाबरोबर वाद घातला. ट्रकला धडक लागून दुचाकीचे नुकसान झाल्याचा बहाणा करत भोलाकुमार याच्याशी वाद घातला. चालकानं दुचाकीचे नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. दोघांनी त्याच्या जवळून पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या आरोपी अनासनं त्याच्या जवळील धारदार चाकूने वार करून भोलाकुमारला जागीच ठार करून घटनास्थळावरून पळ काढला.
पळून जात असतानाचे सीसीटीव्ही आले समोर- घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत चालक भोलाकुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुख्मिणी रुग्णालयात पाठविला. बदलकुमार महतो (२१) यांच्या तक्रारीवरून हत्या करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल तपास सुरू केला. आरोपी दुचाकीवरून पळून जात असतानाचे सीसीटीव्ही फुटेज बाजारपेठ पोलिसांच्या तपासात समोर येताच आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यांचा शोध बाजारपेठ पोलीस पथकाने एपीआय हिवाळे आणि त्यांच्या पथकाने सुरू केला.
१८ तासातच आरोपीला अटक- दोन्ही आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकातून अजमेर पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना बाजारपेठ पोलीस पथकाने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी हत्येची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपीना गुन्हा घडल्यापासून १८ तासातच अटक करून खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करीत आहेत.
हेही वाचा-