ठाणे - एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर, दुसरीकडे याच महापालिकेत औषध पुरविण्यासाठी कार्यरत केलेल्या वाहनाचा गैरवापर करणाऱ्या केडीएमसीच्या चालकाला लोणावळ्यात अडविण्यात आले. या चालकाने या व्हॅनमधून काही महिलांना गावी सोडण्यासाठीचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने सदर चालकावर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. बाबासाहेब भंडारी असे या चालकाचे नाव आहे. हा चालक कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये कार्यरत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भंडारे हा 4 महिलांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी केडीएमसीची (क्र. एमएच 05/आर / 0927) व्हॅक्सीन व्हॅन घेऊन निघाला. यासाठी त्याने केडीएमसीची कोणतीही परवानगी घेतली नाही. अत्यावश्यक सेवेतील औषध आणण्याकरता वापरण्यात येणाऱ्या या व्हॅनला दौंड येथे त्याच्या गावी जाताना लोणावळा चेक पोस्टवर अडविण्यात आली. पोलीसांनी चौकशी सुरू केली असता चालक भंडारी याच्याकडे कोणतीही ऑर्डर (परवानगी) नसल्यामुळे तो योग्य उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे पालिकेनेही चालक भंडारी याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.