ठाणे - उल्हासनगरमध्ये अवैध दारूसाठ्यावर कारवाई करण्यात आली आहे. हिल लाईन पोलिसांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईत एकूण २ लाख ८३ हजार ६२० रूपयांच्या दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. तर एका दारू माफियालाही पोलिसांनी गजाआड केले आहे. हा दारू माफिया दमणमधून कोणताही शासकीय कर न भरता महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करत होता. राकेश उर्फ रॉकी चांदवानी (वय 29) असे पोलिसांनी अटक केलेल्या दारू माफियाचे नाव आहे.
एका ह्युंदाई कारमधून लाखो रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीररित्या दमन राज्यातून उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील भाटिया चौकात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून, सायंकाळच्या सुमाराला पोलीस पथकासह भाटिया चौकाजवळील संतोषी माता मंदिरासमोर सापळा रचण्यात आला होता.
यावेळी, राकेश उर्फ रॉकी हा ह्युंदाई कारमधून विदेशी मद्याचा साठा वाहतूक करताना आढळून आला. त्यानंतर, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, त्या कारची तपासणी केली. यावेळी कारमध्ये 12 डीएसपी ब्लॅक कंपनीचा विदेशी मद्याच्या बाटल्या, 50 रॉयल स्टेग, 12 मॅकडॉल, 4 ब्लेंडर्स प्राईड अशा विदेशी मद्याच्या बाटल्यांचा साठा मिळाला. त्यांनतर पोलिसांनी कार आणि विदेशी मद्याचा साठा जप्त केला.
याप्रकरणी, पोलीस नाईक चंद्रशेखर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिल लाइन पोलीस ठाण्यात दारू माफिया राकेश उर्फ रॉकी याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.