ठाणे - कोरोनामुळे सर्व शासकीय आणि निमशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्यामुळे अन्य समस्यांकडे लक्ष द्यायला कोणत्याही यंत्रणेकडे वेळ नसताना नागरी वस्तीत घुसलेल्या भल्यामोठ्या अजगराने रहिवाशांची पुरती झोप उडाली होती. मात्र, डोंबिवलीतील काही दक्ष सर्पमित्र तरुणांच्या प्रयत्नांमुळे नागरी वस्तीत घुसखोरी करणाऱ्या अजगराला पकडून जंगलात सोडण्यात आले आहे.
जंगल, शेती नष्ट करून मोठमोठी गृहसंकुले उभारली जात आहे. त्यातच वातावरण बदल झाल्याने बिळातून विषारी-बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरकाव करत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. प्रिमियर कॉलनीलगत असलेल्या एका गृहसंकुलात शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अजगर घुसल्याचे पाहिल्यानंतर तेथील रहिवाशांची भीतीने गाळण उडाली. अजगराला पाहण्यासाठी रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते.
दरम्यान, तेथील रहिवाशांनी सोसायटीच्या आवारात अजगर घुसल्याची माहिती सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा सर्पमित्र सौरभ मुळ्ये याला दिली. त्यानुसार मुळ्ये याने ओजस ठोंबरे, गौरव कारंडे, राहुल जगन्ना, वेदांत लकेश्री, आणि राहुल कारंडे या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या अजस्त्र अजगराला पकडून एका पिंपात ठेवले. त्यानंतर हा अजगर कल्याणचे वनपरिक्षेत्र अधिकारी ढगळे आणि जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागासाठी असलेल्या राखीव जागेत सुरक्षित ठिकाणी आज सोडण्यात आला.
कोरोनासारख्या महामारीच्या संकटात सुद्धा संस्थेचे सदस्य स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वन्यजीवांचे रक्षण करत आहेत. या कामात त्यांना गौरव घरत, विकास गौर अमित पाटील, अमित भणगे आणि कुणाल शाह यांनी सहकार्य केले. सदर गृहसंकुलाचा परिसर स्वच्छ करण्याचे काम चालू आहे. आत्तापर्यंत तेथे आसपासच्या जंगलातून आलेले नाग, धामण, दिवड, आदी विविध प्रजातीचे सर्प आढळून आले आहेत. शनिवारी आढळलेला भारतीय अजगर हा बिनविषारी सर्प आहे. त्याची लांबी जवळपास 10 फूट असून त्याचे वजन 19 किलो 50 ग्रॅम इतके असल्याचे सौरभ मुळ्ये याने सांगितले. या अजगराला वन अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आल्याचेही त्याने सांगितले.