ठाणे - कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना, डॉक्टरांनी देखील कोरोनाच्या भीतीमुळे आपले दवाखाने बंद ठेवले होते. मात्र अशाही परिस्थितीमध्ये भिवंडी शहरातील पद्मानगर येथील डॉ. श्रीपाल जैन हे शेकडो कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. गेल्या वर्षापासून आतापर्यंत त्यांनी रुग्णालय बंद न ठेवता रुग्णांवर उपचार केले. विशेष म्हणजे रविवारी देखील त्यांचा दवाखाना सुरूच आहे.
कोरोना काळात अनेक डॉक्टर रुग्णांकडून संसर्ग होण्याच्या भीतीने दवाखाना बंद करून घरात बसली असताना, पद्मानगर येथील श्री भैरव क्लिनिकचे डॉक्टर श्रीपाल जैन यांनी अव्याहत पणे रुग्ण सेवा सुरू ठेवली. कोरोनामुळे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना बेड मिळत नाही, सर्वत्र ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशाही परिस्थितीमध्ये डॉ. श्रीपाल जैन हे गेल्या वर्षापासून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत. भिवंडी शहरासह ग्रामीण भागातून त्यांच्या क्लिनिकमध्ये दिवसाला सुमारे 70 ते 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी येत आहेत. हे रुग्ण आपल्या सोईनुसार रुग्णालयात येतात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतात व घरीच विलगीकरणामध्ये राहातात सकाळी 9 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत क्लिनिकमध्ये भिवंडी शहर व तालुक्यासह मुलुंड, ठाणे, मीरा भाईंदर, वालीव, वसई, पडघा, वाडा, शहापूर या परिसरातून रुग्ण येत असतात. यातील अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ
या क्लिनिकमध्ये येणारे अनेक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. या रुग्णांना ग्रामीण भागातील असल्यामुळे शहरात येऊन नेमके कुठे उपचार घ्यावेत, काय करावे याबाबत अनेक अडचणी येतात. मात्र डॉ. श्रीपाल जैन यांचे रुग्णालये हे या रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. या रुग्णालयामध्ये रुग्णांच्या अडचणी दूर करून, त्यांना योग्य उपचार मिळत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णालयामध्ये होणारी गर्दी वाढत आहे.