ठाणे : पोलीस अधिकाऱ्यांची पत्नी असलेल्या ४८ वर्षीय पीडितेकडे विचित्र मागणी करण्यात आली आहे. घर रिकामे कर नाही तर, शरीरसुख दे अशी धमकी देणाऱ्या डोंबिवली पूर्वेकडील भाजप शहर मंडळ अध्यक्षावर मानपाडा पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. नंदू जोशी असे गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या शहर मंडळ अध्यक्षाचे नाव आहे.
शारीरीक सुखाची वारंवार मागणी : मिळालेल्या माहितीनुसार पीडित ४८ वर्षीय महिला ही पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असून ती पतीपासून विभक्त राहते. तसेच पीडितेने २०१८ साली पतीपासून फारकत घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यातच पिडीत महिला राहत असलेले घर रिकामे करण्यासाठी नंदू जोशी हे २०१८ पासून एप्रिल २०२३ पर्यंत वारंवार पीडितेच्या घरी जाऊन शारीरिक सुखाची वारंवार मागणी करत आहे असे, पीडित महिलेने मानपाडा ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
नंदू जोशी पीडितेच्या पतीचे मित्र : विशेष म्हणजे पीडित महिला ही एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे. दोघा पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू आहे. त्यातच नंदू जोशी हे पीडितेच्या पतीचे मित्र असून पोटगी रक्कम देण्यासाठी नंदू हे महिलेच्या घरी जात होते. त्याच दरम्यान त्यांनी हे कृत्य केल्याचे बुधवारी ३१ मे रोजी पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तर गुन्हा दाखल असलेले नंदू जोशी हे डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जातात.
जोशींविरोधात गुन्हा दाखल : गुन्हा दाखल होण्यापूर्वी भाजपचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या वर्तणुकीबाबत पोलीस वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्यांच्या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगत उलट भाजपचे डोंबिवली शहराध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांचे नाव कसे बदनाम होईल, असे कारस्थान रचल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.
अटकेसाठी राष्ट्रवादीने आक्रमक : या प्रकरणी उद्या मानपाडा पोलीस ठाण्यासमोर भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी दिली आहे. एकंदरीतच भाजपने जोशी यांच्या बचावासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे नंदू जोशीच्या अटकेसाठी राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्याने या गुन्ह्याचा वाद आणखी पेटणार असल्याचे दिसून येत आहे.