ठाणे - कोरोनाची चाहूल लागताच शासनाने सर्व प्रथम शाळा बंद केल्या. सामाजिक बांधीलकी जपत आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी त्याच वेळेस कोचिंग क्लासेस बंद केले. तेव्हापासून क्लासेसच्या संचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. क्लासेस शैक्षणिक वर्षाच्या अंतिम टप्प्यात बंद झाल्यामुळे वर्षाअखेर येणारी फी मिळालेली नाही. चालू वर्षातही क्लासेस कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे कोचिंग क्लासेस घेणाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आले.
महाराष्ट्रात जवळपास ५० हजार लहान-मोठे कोचिंग क्लासेस आहेत. त्यावर ५ लाख शिक्षक आणि इतर कर्मचाऱयांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु लॉकडाऊनमुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या तरुणांनी क्लासेससाठी भाड्याने गाळे घेतले आहेत. त्यांचे भाडे थकले आहे. काही संचालकांची घरे आणि क्लासेस दोन्ही भाड्याच्या जागेत आहेत. त्याचे पैसे कसे भरायचे हा प्रश्न या क्लासेस संचालकांसमोर उभा राहिला आहे.
क्लासेस सुरू करण्यास परवानगी मिळेल की नाही या सर्व विवंचनेने क्लासेस संचालक आत्महत्येस प्रवृत्त होतील, अशी भीती निर्माण झाली आहे. शासनाच्या दृष्टीने कोचिंग क्लासेस हा घटक कायम दुर्लक्षित राहिला आहे. क्लासेस संचालक हे शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याचे काम करतात. याचा शासनाने विचार करावा आणि क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांना आर्थिक सहाय्य करावे. इतर व्यवसायांप्रमाणे सशर्त क्लासेस घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती कोचिंग क्लासेस संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.