ठाणे - शहराच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्रातील पहिल्यावाहिल्या दिव्यांग स्नेही संवेदना उद्यानाचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या करण्यात आले. ( Devendra Fadnavis inaugrate Garden for Divyang people ) शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नौपाडा येथील लोकमान्य टिळक उद्यानाचे नूतनीकरण केलेले हे उद्यान राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे ( Rajyasabha MP Vinay Sahasrabuddhe ) यांचा स्थानिक क्षेत्र विकास निधी आणि ठाणे महापालिका यांच्याद्वारे संयुक्तपणे तयार करण्यात आले आहे. याचा फायदा हजारो दिव्यांगाना होणार असून या अनोख्या उद्यानाची संकल्पना सर्वानाच आवडणारी आहे.
उद्यानात काय विशेष -
नूतनीकरण करत दिव्यांग स्नेही बनवलेल्या नव्या टिळक उद्यानामागील संकल्पनेचे वेगळेपण, यात राबविलेल्या अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांमध्ये आहे. पूर्णपणे अडथळेमुक्त अशा या उद्यानात, ब्रेल लिपीमध्ये सूचनादेखील उपलब्ध आहेत. या उद्यानात एक संवेदी विभागदेखील आहे जेथे दिव्यांग व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी गंध, आवाज, स्पर्श आणि चव यासारख्या त्यांच्या जन्मजात संवेदी क्षमतांचा वापर करू शकतात. सुगंधी वनस्पतीयुक्त असा एक स्वतंत्र विभाग, सुरक्षित स्पर्शासाठी काटे नसलेल्या वनस्पती, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज असलेले पाणी आणि काही खाद्य वनस्पती ही या बागेतील वनस्पती विभागाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
दृष्टिहीनांसाठी एक संवेदी ट्रॅकदेखील आहे, जिथे ते चालताना वाळू, दगड, पाणी आणि गवत यांच्यातील फरक स्पर्शाने अनुभवू शकतात. बागेत प्रवेश करणे अर्थातच व्हीलचेअरसाठी अनुकूल आहे आणि उद्यानाच्या आतील रस्ते देखील एक्यूप्रेशर टाइल्सने सुसज्ज आहेत. ओपन एअर जिम सोबतच, या उद्यानात पियानो सारख्या ओपन एअर वाद्यांचा एक संचदेखील आहे, ज्यावर दिव्यांग मुले वापर करू शकतात. उद्यानात दिव्यांगस्नेही संस्थांसाठी एक स्वतंत्र जागा देखील उपलब्ध असेल, जिथे दिव्यांग मुलांच्या पालकत्त्वासाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन केले जाऊ शकते. तसेच, जागतिक पटलावर प्रसिद्ध अशा दिव्यांग वीरांबद्दल माहिती देणारी छायाचित्रे आणि त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र चितारलेली एक भिंत असलेला ‘हॉल ऑफ फेम’ या उद्यानाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे.
ठाण्यातील दिव्यांग मंडळींना समर्पित असलेले हे उद्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तयार होऊन त्याचा लोकार्पण होत असल्याने, ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा झालेल्या महान स्वातंत्र्यसैनिक अनंत कान्हेरे यांसह इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ एक विशेष विभाग देखील उद्यानात बनवण्यात करण्यात आला आहे. उद्यान दिव्यांग व्यक्तींसाठी असले तरी, ते सर्वांसाठी खुले आहे आणि आपल्या दिव्यांग परिचितांना उद्यानात घेऊन येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत असल्याचे भाजप राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
ब्रेल लिपीत उपलब्ध आहे माहिती -
या उद्यानात असलेल्या झाडांची माहिती ब्रेल लिपीत लिहलेली आहे. त्यामुळे अंध बांधवांना या झाडांची माहिती स्पर्शाच्या माध्यमातून मिळणार आहे. यासोबत शूरवीरांची आणि स्वतंत्र सैनिकांची माहिती ब्रेल लिपीत देखील उपलब्ध करून दिली आहे. संवेदनाच्या माध्यमातून सर्वांना माहिती उपलब्ध करुन देण्याचा हा चांगला प्रयत्न आहे.
विरंगुळाच उपलब्ध नाही -
दिव्यांग आणि अपंग विध्यार्थी नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांचे उद्यान खेळाची साहित्य काहीच मदतीची नसतात. त्यामुळे त्यांना मनोरंजनाची साधनेच उपलब्ध नसतात. त्यामुळे त्याना विरंगुळा नसतो. आता या अनोख्या उद्यानाचा फायदा सर्वानासाठी उपलब्ध होणार आहे.