ठाणे : मीरा भाईंदर शहरात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव थांबवण्यासाठी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी विविध उपाययोजना राबवत आहेत. परंतु कोरोनाने आता मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये शिरकाव केला असून आरोग्य विभागाचे उपायुक्त यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ठ झालं आहे. तर, पाणीपुरवठा विभाग, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, जनसंपर्क विभाग, नगररचना विभागामध्ये अनेक कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत.
मीरा भाईंदर शहरात कोरोनाची संख्या ४ हजार पार पोहोचली असून कोरोनामुक्तांची संख्यादेखील चांगली आहे. परंतु अत्यावश्यक सेवेत काम करत असलेले अनेक कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेतील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांनी उपचार घेऊन कोरोनावर मात केली असून ते पुन्हा आपल्या कामावर रुजू झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सौम्य लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांनी घरीच अलगीकरण करून घेतले आहे.
गेल्या अडीच महिन्यामध्ये मिरा भाईंदर क्षेत्रातील रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका यांना लागण झाली होती. परंतु, आता मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्येही कोरोनाने शिरकाव केल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.