ठाणे - डोंबिवली जवळच्या नांदीवली गावात राहणाऱ्या 8 वर्षीय मुलीला डेंग्यूची लागण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. एकीकडे विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू असल्याने प्रशासन त्या कार्यवाहीत व्यस्त आहे. मात्र, दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात, विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे एका घटनेतून समोर आले आहे. ही खबर प्रशासनापर्यंत जाताच वैद्यकीय आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे.
हेही वाचा - ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन
डोंबिवलीत सर्वोदय पार्क गृहसंकुलात राहणाऱ्या 8 वर्षीय मुलीला या मुलीला थंडी वाजून ताप आल्याने पालकांनी तिला तात्काळ एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे वैद्यकीय तपासणी केली असता या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सदर मुलीला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली. मात्र, तातडीने उपचार केल्यामुळे या मुलीची प्रकृती स्थिर झाली. या पार्श्वभूमीवर त्याच इमारतीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते अवधूत सावंत यांनी दक्षता म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त गोविंद बोडके आणि वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर प्रकाराची माहिती दिली. आयुक्त बोडके यांनी चौकशीचे फर्मान सोडल्यानंतर वैद्यकीय आरोग्य विभागाची धावपळ उडाली.
हेही वाचा - करमाळ्यात दुचाकी-बसचा अपघात; एक ठार, एक जखमी
रविवारी निळजे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी प्रशांत गुजर आणि त्यांच्या पथकाने डेंग्यू झालेल्या रूग्ण मुलीची आणि तिच्या पालकांना भेटून माहिती घेतली. त्यानंतर या पथकाने संकुल परिसराची पाहणी केली. तरण तलाव आणि खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होण्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. डेंग्यूचे डासांच्या अंगावर वाघासारखे पट्टे असल्याने त्याला टायगर मॉस्किटो म्हणतात. घर वा घराभोवतीच्या साठलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. यासाठी रहिवाशांनी पाण्याचे साठे उघडे ठेवू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.